मद्यविक्रेत्यांकडून ६५ लाखांचा दंड वसूल
By Admin | Published: December 24, 2014 12:00 AM2014-12-24T00:00:45+5:302014-12-24T00:00:59+5:30
पाच परवाने रद्द : उत्पादन शुल्क विभागाने केली धडक कारवाई
नाशिक : परवानाधारक मद्यविक्रेत्यांकडून केल्या जाणाऱ्या नियमभंगाच्या एकूण २७४ प्रकरणे राज्य उत्पादन शुल्क खात्याने उघडकीस आणून आठ महिन्यांत जवळपास ६५ लाख रुपयांचा दंड वसूल केला असून, गंभीर स्वरूपाच्या तक्रारी असलेले पाच परवाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये रद्द करण्यात आले आहेत.
किरकोळ व घाऊक मद्य विक्रीसाठी शासनाकडून वेगवेगळे परवाने दिले जात असतानाही मद्यविक्रेत्यांकडून वेळोवेळी नियमभंगाचे प्रकार होतात. त्यात प्रामुख्याने ज्या मद्यविक्रीचे परवाने नाहीत, त्याची विक्री करणे, किमतीपेक्षा जादा दर आकरणे, परराज्यातील मद्याची विक्री करणे अशा विविध प्रकारचे नियमभंग केले जातात. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांकडून वेळोवेळी केल्या जाणाऱ्या तपासणीतून या बाबी निदर्शनास येऊन त्याआधारे कारवाई केली जाते. चालू वर्षी मार्च २०१४ अखेरपर्यंत अशा स्वरूपाचे १५४ प्रकरणांपैकी १३५ गुन्हे निकाली काढण्यात येऊन दुकानदारांकडून ५० लाख, ३४ हजार रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आली, तर मार्च २०१४ ते नोव्हेंबर या कालावधी १२० गुन्हे नोंदवून त्यापैकी ४६ प्रकरणे तडजोड करून निकाली काढण्यात येऊन त्यापोटी १४ लाख, ६५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर पाच दुकाने बंद करण्यात आली आहेत.