राज्यात मद्य दुकानांना परवानगी, मग मंदिरांना का नाही? रामसनेहीदास महाराजांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 07:58 PM2020-07-11T19:58:35+5:302020-07-11T20:02:38+5:30
नाशिक : लॉकडाऊनमध्ये आता शिथिलता आल्याने अनेक उद्योग व्यवसाय सुरू झाले आहेत. अगदी मदिरालये पण सुरू झाले असले तरी मंदिरे मात्र का खुली करू दिली जात नाही? असा सवाल नाशिकच्या बडा लक्ष्मीनारायण मंदिराचे महंत रामसनेहीदास महाराज यांनी केला आहे. सध्या मंदिरे, मठ आणि अन्य सर्वच धार्मिक स्थळे सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना हे मत व्यक्त केले.
नाशिक : लॉकडाऊनमध्ये आता शिथिलता आल्याने अनेक उद्योग व्यवसाय सुरू झाले आहेत. अगदी मदिरालये पण सुरू झाले असले तरी मंदिरे मात्र का खुली करू दिली जात नाही? असा सवाल नाशिकच्या बडा लक्ष्मीनारायण मंदिराचे महंत रामसनेहीदास महाराज यांनी केला आहे. सध्या मंदिरे, मठ आणि अन्य सर्वच धार्मिक स्थळे सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना हे मत व्यक्त केले.
प्रश्न- सध्या मंदिरे उघडण्यासाठी दबाव वाढला आहे. त्याविषयी काय सांगाल?
महंत- कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी शासनाने लॉकडाऊन लागू करून सर्व काही बंद केले त्यात मंदिरे आणि अन्य धर्मीयांच्या धार्मिक स्थळांचादेखील समावेश होता. मात्र, आता लॉकडाऊनचे निर्बंध बऱ्यापैकी शिथिल होत आहेत. शासनाला महसूल हवा म्हणून मदिरालये सुरू करण्यात आली आहेत, मग आता मंदिरे सुरू करण्याची मागणी पुढे आली तर गैर काय? नागरिकांची श्रद्धा असल्याने सर्व धार्मिक स्थळे आता खुली करायला हवी. शासनाच्या आदेशानुसार आरोग्य सुरक्षा नियमांचे पालन धार्मिक संस्था करतीलच, परंतु भाविकदेखील करतील, त्यामुळे आता मंदिरे आणि अन्य धर्मीयांची धार्मिक स्थळे सुरू करण्याची गरज आहे. राज्यात शिवसेनेसारख्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री असल्याने त्यांनी मुळातच याचा प्राधान्याने विचार करायला हवा.
प्रश्न- सध्या अनेक ठिकाणच्या यात्रादेखील बंद करण्यात येत आहेत, त्यामुळे मंदिरे उघडण्यास परवानगी मिळेल का?
महंत-हा भाविकांच्या श्रद्धेचा तसेच सनातन धर्माचा आणि अन्य धर्मांच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आहे. पुरी येथील यात्रेवरदेखील निर्बंध घालण्यात आले; परंतु ती यात्रा पार पडली. आता गणेशोत्सवावर निर्बंध घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतर दुर्गापूजादेखील आहे. अशाप्रकारे सनातन धर्माच्या परंपरा खंडित करणे अत्यंत चुकीचे आहे. यंदा कोरोनाचे कारण देऊन बंदी घातली जाईल आणि पुढील वर्षी आणखी नवा मुद्दा उपस्थित करून गेल्यावर्षी उत्सव झाला नाही म्हणून यंदाही उत्सव करू नका, असे सांगितले जाईल. अशा परंपरा खंडित झाल्या तर सनातन धर्मच लोप पावेल. शासनाने नियम, मर्यादा काहीही करावे मात्र परंपरा खंडित करू नये, मशिदी, गुरुद्वारा सर्वच सुरू करावे अशी अपेक्षा आहे.
प्रश्न- मंदिरे आणि अन्य धार्मिक स्थळी नागरिक नियमांचे पालन करतील काय?
महंत- अनेक मंदिरांमध्ये आजही अंतर्गत व्यवस्था सुरू आहे. तेथे सुरक्षित अंतर, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करून कामकाज चालते. काही खुल्या मंदिरात एक दोन भाविक येतात; परंतु तेही सुरक्षा नियमांचे पालन करतात. मंदिरे खुली करताना चार ते पाच नागरिकांनाच प्रवेश, मास्क आवश्यक असे नियम केले तरी चालू शकतात. मुळाच आता बाहेरगावाहून भाविक येण्याचा प्रश्न नाही आणि स्थानिक स्तरावरील नागरिक फार मोठ्या संख्येने येतील असे नाही. त्यामुळे मंदिरे आणि सर्वच धर्मीयांची धार्मिक स्थळे सुरू करण्याबाबत परवानगी दिली पाहिजे.
मुलाखत- संजय पाठक