भाजपाची यादी दोन टप्प्यांत
By admin | Published: January 30, 2017 12:20 AM2017-01-30T00:20:49+5:302017-01-30T00:21:07+5:30
चर्चा : आज नावे जाहीर होण्याची शक्यता
नाशिक : भाजपा-सेनेची युती मोडल्यानंतर आता दोन्ही पक्षांनी आपली रणनिती आखणे सुरू केले आहे. दरम्यान, उमेदवारांची यादी रविवारी जाहीर केली जाणार होती, परंतु पालकमंत्री रात्रीपर्यंत आले नव्हते. त्यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांशी चर्चा होऊन उमेदवारांची पहिली यादी सोमवार (दि. ३०) दुपारी जाहीर केली जाईल, असा अंदाज पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
पहिल्यापासूनच युती नको असल्याची भूमिका घेत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेत इच्छुकांच्या मुलाखतीकरिता सर्व जागांकरिता उमेदवारांची तयार केलेली यादी श्रेष्ठींकडे पाठविली. त्यावर दोन दिवसांत निर्णय घेतला जाणार होता. दरम्यानच्या काळात युती तुटल्याने उमेदवारांची यादी लगेच जाहीर होण्याची शक्यता वर्तविली गेली. पालकमंत्री गिरीश महाजन रात्री उशिरा नाशकात येणार असून, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर कदाचित सोमवारी दुपारी यावर निर्णय होऊ शकतो, असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले. भाजपाकडे इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असल्याने उमेदवार निवडताना सर्वतोपरी विचार करीत निर्णय घ्यावा लागत असल्याने श्रेष्ठींकडे पाठविलेली यादी आणि त्यानंतरची परिस्थिती लक्षात घेऊन कदाचित सोमवारी पहिल्या यादीतील नावे जाहीर केली जातील, असे या पदाधिकाऱ्याने सांगितले.