दर्शनी भागात यादी झळकवणार
By admin | Published: February 5, 2017 11:46 PM2017-02-05T23:46:38+5:302017-02-05T23:47:37+5:30
सिन्नर : शौचालय नसेल तर दंड; स्वच्छ, सुंदर शहरासाठी उपाययोजना
सिन्नर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रत्येक गाव शंभर टक्के हगणदारीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीने कंबर कसली आहे. ज्या गावातील कुटुंबाकडे शौचालय नसेल अशा कुटुंबीयांची यादी गावाच्या दर्शनी भागात लावण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी दिली. ग्रामस्थांनी वैयक्तिक शौचालय बांधावे व त्याचा वापर करावा, यासाठी अनेक दिवसांपासून शासन प्रयत्न करीत आहेत. मात्र त्याचा फारसा उपयोग होत नसल्याने शासनाने कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. त्याचा एक भाग म्हणून ज्या कुटुंबीयांकडे वैयक्तिक शौचालये नसतील किंवा त्याचा वापर करीत नसेल अशा कुटुंबीयांच्या नावांची यादी गावाच्या दर्शनी भागात लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हगणदारीमुक्त गावासाठी पुढील आठवड्यापासून सदर मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर दर बुधवारी गुडमॉर्निंग पथक प्रत्येक गावात जाणार आहे. उघड्यावर शौचाला जाणाऱ्या नागरिकांचे प्रबोधन करण्यासह त्यांना गुलाबपुष्प देण्यात येणार आहे. ज्यांना गुलाबपुष्प दिले जाईल त्यांचे पूर्ण नाव ग्रामसेवक पंचायत समितीत कळवणार आहेत. उघड्यावर शौचाला जाणाऱ्या व्यक्तीची नावे समजल्यानंतर पोलीस त्यांच्याकडे जाऊन समज देणार आहेत. पंचायत समितीच्या वतीने गुडमॉर्निंग पथकाची नेमणूक केली असून, बुधवारपासून मोहिमेस प्रारंभ केला जाणार आहे. (वार्ताहर)