नाशिक जिल्ह्याची अंतिम मतदार यादी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 07:14 PM2019-01-31T19:14:13+5:302019-01-31T19:14:47+5:30
निवडणूक आयोगाने यंदा जुलै महिन्यात मतदार पुनरीक्षण मोहीम राबविली असता, त्यात नवमतदारांची अधिकाधिक नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यासाठी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर बारावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच नाव नोंदणीची सोय करण्यात आली होती
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने विधानसभा मतदार संघनिहाय अंतिम मतदार यादी जाहीर केली असून, शुक्रवारपासून जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना पाहण्यासाठी ही यादी उपलब्ध होणार आहे. सप्टेंबर महिन्यात जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीनंतर नव्याने नोंदणी करण्यात आलेल्या मतदारांची संख्या पाहता, जिल्ह्यात नव्याने ५५ हजार मतदारांची नोंदणी करण्यात आली असून, या सर्वांना येत्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
निवडणूक आयोगाने यंदा जुलै महिन्यात मतदार पुनरीक्षण मोहीम राबविली असता, त्यात नवमतदारांची अधिकाधिक नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यासाठी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर बारावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच नाव नोंदणीची सोय करण्यात आली होती. याशिवाय ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत त्यांनाही नव्याने संधी देण्यात आली. साधारणत: तीन महिने राबविलेल्या या मोहिमेनंतर सप्टेंबरअखेर आयोगाने जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली. त्यात ४२,६०,३९२ मतदारांचा समावेश होता. त्यानंतरही आयोगाने पुन्हा मतदार नोंदणीची संधी उपलब्ध करून दिली. या काळात सुमारे दोन लाखांहून अधिक मतदारांचे अर्ज स्थानिक पातळीवर प्राप्त झाले. त्याची छाननी केली असता, दुबार, मयत व स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्यात आल्यानंतर अंतिम मतदार यादीत ४३ लाख १५ हजार ५७८ मतदारांचा समावेश करण्यात आला. त्यात २२ लाख ६७ हजार ५४७ पुरुष, तर २० लाख ४७ हजार ९६० महिलांचा समावेश आहे. प्रारूप मतदार यादी व अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्यात ५५,१८६ मतदारांची वाढ झाली आहे. या मतदार यादीत ७१ तृतीयपंथीय मतदारांचाही समावेश आहे.
गुरुवारी ही अंतिम मतदार यादी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील, प्रांत कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली असून, शुक्रवारपासून जिल्ह्यातील ४४४६ मतदान केंद्रांवर मतदारांसाठी ती पाहण्यासाठी उपलब्ध असेल.