कळवण तालुक्यातून हजार लाभार्थींची यादी सादर
By admin | Published: January 17, 2016 12:40 AM2016-01-17T00:40:25+5:302016-01-17T00:42:23+5:30
इंदिरा आवास : माजी अध्यक्षांनी दिले पत्र
नाशिक : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात येणाऱ्या इंदिरा आवास योजनेंतर्गत एकट्या कळवण तालुक्यातूनच एक हजाराहून अधिक वंचित लाभार्थींची यादी विभागीय आयुक्तांनाच सादर करण्यात आल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे या योजनेसाठी लाभार्थीच शिल्लक नसल्याचा दावा विभागाने केला होता.
माजी अध्यक्ष जयश्री नितीन पवार यांनी १४ जानेवारीला याबाबत विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांना पत्र पाठविले आहे. त्यात नमूद केले आहे की, दारिद्र्यरेषेखालील बेघर लाभार्थींची यादी व प्रतीक्षा यादी कळवण तालुक्यातून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला पाठविली आहे. मात्र यादी तयार करताना बहुतेक गावातील दारिद्र्यरेषेखालील बेघर लाभार्थींची नावे प्रतीक्षा यादी करताना अनावधानाने राहून गेली आहेत. सन २०१४-१५ अखेर कळवण तालुक्यातील प्रतीक्षा यादीतील लाभार्थींना शंभर टक्केलाभ मिळाला आहे. असे असले तरी कळवण पंचायत समितीअंतर्गत असलेल्या ग्रामपंचायतींचे लाभार्थी प्रतीक्षा यादीत नसलेले, परंतु दारिद्र्यरेषेखालील बेघर पात्र लाभार्थी प्रतीक्षाव्यतिरिक्त वंचित बेघर दारिद्र्यरेषेखालील १४ गावांतील वंचित लाभार्थी संख्या ३७२ असून, ती यादी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे पाठविली आहे.
तसेच प्रतीक्षा व्यतिरिक्त वंचित बेघर दारिद्र्यरेषेखालील ३२ गावांमधील वंचित लाभार्थींची संख्या ९०७ असून ही यादी कळवण पंचायत समिती स्तरावर उपलब्ध आहे. त्यामुळे वंचित लाभार्थी संख्या १२७९ इतकी आहे. कळवण पंचायत समितीला ८४२ घरकुल बांधण्याचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे, परंतु प्रतीक्षा यादी संपल्याने घरकुल मंजूर करता आलेले नाही. त्यामुळे प्रतीक्षा यादीव्यतिरिक्त वंचित लाभार्थींना लाभ दिल्यास कळवण तालुक्यातील बेघर दारिद्र्यरेषेखालील वंचित लाभार्थींना मागील सर्वेक्षणानुसार लाभ मिळणार असल्याचे या पत्रात नमूद केले आहे. म्हणजेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने इंदिरा आवास घरकुल योजनेसाठी लाभार्थ्यांची यादीच संपल्याचे जे चित्र तयार केले आहे, वस्तुत: प्रत्येक तालुकानिहाय वंचितांची यादी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे पाठविल्याचा दावा आता करण्यात येत आहे. एकट्या कळवण तालुक्यातूनच घरकुलांपासून वंचित लाभार्थींची संख्या बाराशेच्या वर असल्याने जिल्ह्यातून असा आकडा वाढण्याची शक्यता आहे. इंदिरा आवास घरकुल योजनेतून चालू वर्षी सुमारे दहा हजार घरकुले बांधावयाची आहेत. (प्रतिनिधी)