पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी
By admin | Published: March 3, 2016 11:20 PM2016-03-03T23:20:48+5:302016-03-03T23:30:47+5:30
आढावा बैठक : सत्ताधारी-विरोधकांचा सभात्याग; अनुपस्थित अधिकाऱ्यांवर आरोप
सिन्नर : येथील पंचायत समितीची मासिक आढावा बैठक माजी सभापती बाळासाहेब वाघ व गटनेते उदय सांगळे यांच्या जोरदार शाब्दिक खडाजंगीने चांगलीच गाजली. उभय जबाबदार लोकप्रतिनिधी एकमेकांवर वैयक्तिक आरोपांची चिखलफेक करीत असल्याचे पाहून सभागृहातील उपस्थित सदस्य, अधिकारी व कर्मचाऱ्यांना अवाक् होण्याची वेळ आली. त्यानंतर अनेक खात्यांचे प्रमुख आढावा बैठकीला अनुपस्थित असल्याचे पाहून बैठक अर्धवट सोडून सत्ताधारी व विरोधी दोन्ही गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत गैरहजर खातेप्रमुखांचा निषेध करीत सभागृहातून काढता पाय घेतला.
पंचायत समितीची मासिक आढावा बैठक सभापती संगीता विजय काटे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. बैठकीत आढावा घेण्यास प्रारंभ केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कृषी विभाग, राज्य परिवहन महामंडळ, सामाजिक वनीकरण, वनविभाग, पशुसंवर्धन, शिक्षण, वीज वितरण कंपनी यांच्यासह राज्य शासनाच्या विविध खात्याचे प्रमुख अनुपस्थित असल्याचे दिसून आले. काही खात्यांनी बैठकीला प्रतिनिधी म्हणून कर्मचाऱ्यांना बैठकीस पाठविले होते. या कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्याची पूर्ण माहिती नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने आढावा बैठकीस पाठविलेल्या कर्मचाऱ्यास तालुक्यातील पाणी योजनांची पूर्ण माहिती नव्हती. त्यानंतर ग्रामपंचायत विभागाचा आढावा घेण्यात आला. राज्य शासनाच्या अनेक खात्यांचे प्रमुख आढावा बैठकीस अनुपस्थित राहिल्याने आमदार-खासदार निधीतून होणाऱ्या योजनांबाबत कोणतीच माहिती मिळत नसल्याची तक्रार यावेळी करण्यात आली.
बैठकीत लघुपाटबंधारे विभागाचा आढावा सुरू होताच माजी सभापती बाळाबाहेब वाघ व गटनेते उदय सांगळे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले. टंचाई आराखड्यातून दोडी गावचा विषय निघताच वादावादीस प्रारंभ झाला. वाघ अधिकाऱ्यांवर दडपण आणून योजना रखडवत असल्याचा आरोप सांगळे यांनी करताच वाघ यांनी त्यास तीव्र आक्षेप घेतला. आपण कोणतीही कामे रखडवली नाही किंवा अधिकाऱ्यांवर दडपण आणले नसल्याचे वाघ यांनी सांगून सभागृहात कोणत्याही अधिकाऱ्याने आपल्याविरोधात तक्रार असल्यास मांडावी असे आवाहन केले. सांगळे यांनी त्यानंतर वाघ यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल्यानंतर जोरदार शाब्दिक खडाजंगीला प्रारंभ झाला. उभय पदाधिकाऱ्यांनी एकमेकांवर अतिशय गंभीर व वैयक्तिक आरोप केल्यानंतर सत्ताधारी व विरोधी दोन्ही गटाच्या सदस्यांना मध्यस्थी करून वाद थांबविण्याची वेळ आली. त्यानंतर वाघ व सांगळे शांत झाले.
वाघ व सांगळे यांच्यातील शाब्दिक चकमकीनंतर दोन्ही गटाच्या सदस्यांनी खातेप्रमुखांना लक्ष्य केले. अनेक विभागांचे खातेप्रमुख आढावा बैठकीस गैरहजर राहिल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. अधिकारी बेजबाबदारपणे वागत असल्याचा आरोप करीत वाघ यांनी निषेध नोंदविला. तालुक्यात भीषण टंचाई व दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना अधिकाऱ्यांना गांभीर्य नसल्याचा आरोप सांगळे यांनी केला. दुष्काळी परिस्थितीत महत्त्वाची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांना रजा मिळताच कशा, असा सवाल पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. त्यानंतर बेजबाबदार अधिकाऱ्यांचा निषेध करीत सभा तहकूब करण्याचा निर्णय सत्ताधारी व विरोधकांनी एकमताने घेतला. विशेष म्हणजे कडाक्याच्या भांडणानंतर सभा तहकूब करण्याच्या ठरावाला सूचक उदय सांगळे, तर अनुमोदक बाळासाहेब वाघ झाले. पुढील आढावा बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा जिल्हा परिषदेच्या जबाबदार अधिकाऱ्यांना बोलविण्याची मागणी सदस्यांनी केली. बैठकीस उपसभापती राजेंद्र घुमरे, प्रभारी गटविकास अधिकारी मधुकर वाघ, पंचायत समिती सदस्य रामदास खुळे, प्रकाश कदम, वसंत उघडे, अलका मुरडनर, सोनल कर्डक, अलका पवार, सविता पवार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित
होते. (वार्ताहर)