रात्रीच्या अंधारात अक्षरश: पळ काढला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 04:24 PM2019-11-26T16:24:03+5:302019-11-26T16:24:36+5:30
नितीन पवार यांनी कथन केला सुटकेचा थरार
कळवण : राज्यात घडत गेलेल्या अनाकलनीय घटनांमुळे आपण राष्ट्रवादी पक्षाशी प्रामाणिक आहोत, हे सिध्द करण्यासाठी गुडगावच्या हॉटेलमधून मी रात्रीच्या अंधारात अक्षरश: पळ काढला आणि सुरक्षितपणे मुंबई गाठत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात दाखल झाल्याचे सांगत कळवणचे आमदार नितीन पवार यांनी सुटकेचा थरार कथन केला.
नितीन पवार यांनी आपल्या सुटकेचा थरार कथन करताना सांगितले की, शपथविधी सोहळ्यानंतर आम्हाला पोलिस बंदोबस्तात विमानातून नेण्यात येऊन गुडगावला एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले. माध्यमांवरील बातम्या पाहिल्यानंतर सर्व प्रकार लक्षात आला. मात्र कुटुंबियांशी आणि नेत्यांशी संपर्क होत नसल्याने सुरु वातीचे २४ तास खूपच भयभीत वातावरणात गेले. उलटसुलट बातम्या प्रसिध्द होत असल्यामुळे मतदार संघात गैरसमज होईल याची मनात भीती होती. कुटुंब चिंतेत होते. त्यांनी मी बेपत्ता असल्याची तक्र ारही पोलिसात केली. दुसऱ्या दिवशी पक्षाचे नेत्यांशी संपर्क झाल्यानंतर परिस्थिती कथन केली. कुटुंबियांना दिलासा मिळावा म्हणून व्हिडीओ पाठवला. ज्या हॉटेलमध्ये होतो तेथे सर्वत्र बंदोबस्त आणि अनोळखी व्यक्ती असल्यामुळे नेमकी कुठे आहोत हे देखील सांगता येत नव्हते. संपर्क होऊ लागल्याने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विस्तृत कल्पना दिली. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी हॉटेलस्थळावर त्यांचे स्वीय सहाय्यक सिद्धार्थ शिंपी यांना पाठविले होते. मात्र त्यांच्या हालचाली लक्षात आल्याने दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. अखेर पत्नी सौ जयश्री पवार, मुलगा ऋ षिकेश पवार यांना घटनेची कल्पना देऊन मुंबई येथे पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांची भेट घेण्यास सांगितले. त्यानंतर युध्दपातळीवर हालचाली गतिमान झाल्या. मित्र परिवाराच्या सहकार्याने आॅनलाईन दिल्ली ते मुंबई विमानाचे तिकीट बुकिंग करण्यास सांगून हॉटेलजवळ खासगी वाहन तैनात करण्यास सांगितले. रात्री घटनास्थळावरून बाहेर जात आहे हे कुणाला लक्षात येऊ नये म्हणून आहे त्या स्थितीत सोबत असलेली कपड्याची बॅग टाकून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन आपण पळ काढल्याचे पवार यांनी सांगितले.
कुटुंबीयांकडून प्रयत्न
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा झाल्यानंतर जिल्'ातील चार आमदार अजितदादा पवार यांच्या सोबत गेल्याने खळबळ उडाली होती. त्यात कळवणचे आमदार नितीन पवार यांचाही समावेश होता. त्यात नितीन पवार यांच्याशी संपर्क होत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसात पवार बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली होती. त्यानंतर काही तासांतच झिरवाळांसह पवार हे सुटका करून घेत मुंबईत राष्ट्रवादीच्या गोटात दाखल झाले. पवार यांच्या सुटकेसाठी त्यांच्या कुटुंबीयांनीही प्रयत्न केले. त्यामुळे पवार यांचा ठावठिकाणा लागू शकला.