साहित्यिकांची ‘स्वत:च्या जगण्याची गोष्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 12:02 AM2020-01-09T00:02:04+5:302020-01-09T00:02:24+5:30
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक व विद्यापीठाच्या वामनदादा कर्डक अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने तीनदिवसीय अक्षर साहित्य संमेलन उत्साहात झाले. या तीन दिवसात रंगनाथ पठारे, राजन खान, सुप्रसिद्ध कवयित्री नीरजा, शब्दालय प्रकाशनच्या सुमती लांडे, दीनानाथ मनोहर, अनंत सामंत, सतीश तांबे यांसारख्या दिग्गज साहित्यिकांनी स्वत:च्या जगण्याची गोष्ट सांगत अनुभवी तसेच नवलेखकांशी मनमोकळा संवाद साधला. प्रसिद्ध साहित्यिक राजन खान यांच्या समन्वयातून झालेल्या या संमेलनात विविध भागातील साहित्यिक सहभागी झाले होते.
नाशिक : येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक व विद्यापीठाच्या वामनदादा कर्डक अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने तीनदिवसीय अक्षर साहित्य संमेलन उत्साहात झाले. या तीन दिवसात रंगनाथ पठारे, राजन खान, सुप्रसिद्ध कवयित्री नीरजा, शब्दालय प्रकाशनच्या सुमती लांडे, दीनानाथ मनोहर, अनंत सामंत, सतीश तांबे यांसारख्या दिग्गज साहित्यिकांनी स्वत:च्या जगण्याची गोष्ट सांगत अनुभवी तसेच नवलेखकांशी मनमोकळा संवाद साधला. प्रसिद्ध साहित्यिक राजन खान यांच्या समन्वयातून झालेल्या या संमेलनात विविध भागातील साहित्यिक सहभागी झाले होते.
आमदार हेमंत टकले यांच्या हस्ते व कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन यांच्या अध्यक्षतेखाली या संमेलनाचे उद्घाटन झाले. समाजात सांस्कृतिक प्रदूषणाची जेव्हा भीती वाटत असते तेव्हा अक्षर मानवसारखी साहित्य संमेलने ही आश्वासक वाटतात, असे प्रतिपादन आमदार टकले यांनी उद्घाटनप्रसंगी केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी हे साहित्य संमेलन विद्यापीठात होणे म्हणजे विद्यापीठाच्या सामाजिक योगदानाचे प्रतीक असल्याचे सांगितले. सुप्रसिद्ध साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी खरे साहित्यिक लेखन हे सहज प्रकारचे वा ‘स्वांत सुखाय’ असे लेखन नसून तो गंभीर लेखन प्रकार असल्याचे सांगितले. त्यात लेखकाच्या मनाची दीर्घकाळ गुंतवणूक असते, त्याची बौद्धिक व शारीरिक कसरत या काळात सुरू असते. साहित्यिकाने एकप्रकारच्या मरण यातना भोगल्यानंतरच अस्सल साहित्य जन्माला येत असते, असे पठारे म्हणाले.
सत्रनिहाय विविध विषयांवर सहभागी साहित्यिकांनी आपापली मते मांडली. सुप्रसिद्ध कवयित्री नीरजा, शब्दालय प्रकाशनाच्या सुमती लांडे, दीनानाथ मनोहर, अनंत सामंत, सतीश तांबे, श्रीकांत चौगुले, रविप्रकाश कुलकर्णी, अशोक थोरात, संदीप खाडिलकर, सुबोध जावडेकर आदी साहित्यिकांच्या चर्चासत्रांनी संमेलनात विशेष रंग भरला.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे लोकेश शेवडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. विद्यापीठाच्या वामनदादा कर्डक अध्यासनाचे प्रमुख प्रा. विजयकुमार पाईकराव यांनी अध्यासनाविषयी माहिती दिली. यावेळी दत्ता पाटील लिखित व सचिन शिंदे दिग्दर्शित ‘नेब्युला’ या नाटकाचा प्रयोग या संमेलनात सादर करण्यात आला. डॉ. मनीषा जगताप यांची निर्मिती असलेल्या या प्रायोगिक नाटकात
राम दौंड, दीप्ती चंद्रात्रे, उर्वराज गायकवाड, एकता आढाव यांच्या भूमिका आहेत.
टकले यांची मुलाखत रंगली
अक्षर मानव साहित्य संमेलनाचे प्रणेते व प्रख्यात साहित्यिक राजन खान यांनी आमदार हेमंत टकले यांची ‘लोकप्रतिनिधीमधील साहित्यिक’ याविषयी घेतलेली छोटेखानी मुलाखत विशेष ठरली. त्यात आमदार टकले यांनी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज ते राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समवेतच्या साहित्यिक, राजकीय आठवणींना उजाळा दिला.