साहित्यिक शहाणे, मॅजिस्टिकचे कोठावळे यांचा होणार सन्मान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:25 AM2021-02-06T04:25:06+5:302021-02-06T04:25:06+5:30
नाशिक : नाशिककरांनी माझे नाव ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदासाठी सुचवले ही आंतरिक हाक होती अशी ...
नाशिक : नाशिककरांनी माझे नाव ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदासाठी सुचवले ही आंतरिक हाक होती अशी मनस्वी भावना ज्येष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे यांनी व्यक्त केली. नाशिकला होणाऱ्या साहित्य संमेलनात शहाणे आणि मॅजेस्टिक प्रकाशनचे प्रमुख अशोक कोठावळे यांचा सत्कार करण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शहाणे यांना त्यांच्या पुण्यातील घरी जाऊन आयोजकांच्या वतीने निमंत्रण देण्यात आले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला दि. २६ ते २८ मार्चला होणार असल्याने त्यास आपण सहकुटुंब उपस्थित राहण्याचे निमंत्रण संमेलन निमंत्रक व लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी दिले. यावेळी विश्वस्त दिलीप साळवेकर, कार्याध्यक्ष मुकुंद कुलकर्णी व कार्यकारी सदस्य संजय करंजकर यांनी प्रत्यक्ष भेटून शहाणे यांना निमंत्रणपत्र दिले. यावेळी बोलताना शहाणे यांनी या संमेलनात माझ्या प्रदीर्घ साहित्य सेवेचा होणारा गौरव व सत्कार हा माझा घरचा सन्मान असल्याचे सांगितले. यावेळी जुन्या आठवणीत रमलेल्या शहाणे यांनी आचार्य अत्रे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे झालेले सन १९४२चे संमेलन, तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेले सन १९६४चे गोव्यातील साहित्य संमेलन यातील अनुभव रंगवून सांगितले. शिवाय त्यांच्या सूचनेनुसार डाॅ. अ.वा. वर्टी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष असताना सुरू झालेले जिल्हा साहित्य संमेलन आजही भरते याबद्दल आनंद व्यक्त केला. शहाणे हे संपूर्ण महाराष्ट्राला मराठी कथाकार, कादंबरीकार आणि अमृत या मराठी डायजेस्टचे प्रमुख संपादक म्हणून ज्ञात आहेत. त्यांनी कादंबऱ्या, दीर्घकथा, लघुकथा, कथासंग्रह असे विपुल लिखाण केले आहे. या लिखाणासाठी त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, महाराष्ट्र फाय फाउण्डेशन पुरस्कार, राज्य साहित्य पुरस्कार, भाऊ पाध्ये पुरस्कार तसेच राज्य नाट्य पुरस्कारांनीदेखील गौरविण्यात आले आहे.
कोठावळे यांची यशोगाथा
केशवरावांनी स्थापन केलेल्या आणि अशोक कोठावळे यांनी वाढवलेले मॅजेस्टिक प्रकाशन सत्तरीच्या उंबरठ्यावर तर साहित्याला वाहिलेले ललित मासिक साठीजवळ पोहोचले आहे. १९५२ला मॅजेस्टिक प्रकाशन आणि १९६४ला ललित मासिक सुरू करण्यात आले होते. १९८३ साली केशवराव यांचे निधन झाल्यानंतर प्रकाशनाची आणि मासिकाची धुरा अशोकराव यांनी सांभाळली. त्यांनी प्रकाशनाचा डोलारा सांभाळण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात वाढवला. सोबत मॅजेस्टिक बुक डेपोचाही विस्तार केला. त्यांच्या या कार्यकर्तृत्वाचा सत्कार करण्याच्या उद्देशानेच कोठावळे यांचा सत्कार यंदाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात केला जाणार आहे.
फोटो ०५शहाणे
साहित्यिक मनोहर शहाणे यांना घरी जाऊन निमंत्रण देताना लोकहितवादीचे मुकुंद कुलकर्णी. समवेत संजय करंजकर, दिलीप साळवेकर, जयप्रकाश जातेगावकर आदी.
लोगो
बातमीला साहित्य संमेलनाचा लोगो वापरावा.