गोदाकाठी फुलला साहित्य कुंभाचा मेळा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2021 01:35 AM2021-12-04T01:35:30+5:302021-12-04T01:36:09+5:30
गोदाकाठच्या वातावरणात अलवार पसरलेले धुके...हवेतील कुंद गारवा...तात्यासाहेबांच्या निवासस्थानी कुसुमांनी सजविलेली आकर्षक ग्रंथपालखी...टाळ-मृदुगांचा गजर आणि ‘ज्ञानोबा माउली, तुकाराम’च्या जयघोषाने वातावरणात पसरलेले चैतन्य. सोबतीला सारस्वतांचा मेळा...स्वागताला रस्त्यावर चौफेर रेखाटलेली रांगोळी, लक्ष वेधून घेणारे विज्ञान आणि साहित्यिक चित्ररथ, पारंपरिक वेषभूषा करून डोक्यावर ग्रंथ आणि तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झालेल्या सुवासिनी, वारकऱ्यांची वेषभूषा केलेले विद्यार्थी...ढोल, ताशांचा निनाद, लक्षवेधी लेझीम पथकासह मल्लखांब प्रात्यक्षिके, अशा उत्साहपूर्ण वातावरणात माय मराठीचा जागर करत ग्रंथदिंडीने ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ झाला.
नाशिक : गोदाकाठच्या वातावरणात अलवार पसरलेले धुके...हवेतील कुंद गारवा...तात्यासाहेबांच्या निवासस्थानी कुसुमांनी सजविलेली आकर्षक ग्रंथपालखी...टाळ-मृदुगांचा गजर आणि ‘ज्ञानोबा माउली, तुकाराम’च्या जयघोषाने वातावरणात पसरलेले चैतन्य. सोबतीला सारस्वतांचा मेळा...स्वागताला रस्त्यावर चौफेर रेखाटलेली रांगोळी, लक्ष वेधून घेणारे विज्ञान आणि साहित्यिक चित्ररथ, पारंपरिक वेषभूषा करून डोक्यावर ग्रंथ आणि तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झालेल्या सुवासिनी, वारकऱ्यांची वेषभूषा केलेले विद्यार्थी...ढोल, ताशांचा निनाद, लक्षवेधी लेझीम पथकासह मल्लखांब प्रात्यक्षिके, अशा उत्साहपूर्ण वातावरणात माय मराठीचा जागर करत ग्रंथदिंडीने ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ झाला.
शुक्रवारी (दि. ३) सकाळी ९ वाजता टिकळवाडीतील तात्यासाहेबांच्या निवासस्थानी पालखी पूजन करून ग्रंथदिंडीला प्रारंभ झाला. तत्पूर्वी शहरातील विविध भागांतून नवरंगांची उधळण करत दिंडी कुसुमाग्रज स्मारकात दाखल झाल्या होत्या. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, कार्याध्यक्ष दादा गोरे, स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, महापौर सतीश कुलकर्णी, कृषिमंत्री दादा भुसे, विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार हिरामण खोसकर, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार हेमंत टकले, विश्वास ठाकूर यांनी पालखीचे पूजन केले.
‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल...’चा जयघोष करून पालखी सोहळ्याचा शुभारंभ झाला. पालखीच्या स्वागतासाठी संपूर्ण मार्गावर आकर्षक रांगोळी रेखाटण्यात आली होती. पारंपरिक वेषभूषा तुलसी कलस, नऊवारी साडी आणि फेटे परिधान करून सुवासिनी व विविध शाळांतील विद्यार्थिनींनी दिंडीत सहभाग नोंदवला. दिंडीतील चित्ररथ व विज्ञानरथ पाहण्यासाठी नाशिककरांनी गर्दी केली होती. ग्रंथदिंडीच्या सुरुवातीला ढोलपथकाच्या लयबद्ध तालनिनादाने सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले होते. त्यापाठोपाठ रंगीबेरंगी फुलांनी सजवलेल्या ग्रंथदिंडीमुळे चैतन्याचे वातावरण पसरले होते. कुसुमाग्रज स्मारकांतून निघालेली ग्रंथदिंडीने महापौर बंगला, टिळकवाडी सिग्नल चौकातून शब्दाक्षरांचा जागर करत मार्गक्रमण केले. जुने सिबीएस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करून पुढे शिवाजी रोडवरून दिंडी परशुराम सायखेडकर नाट्यगृहात दाखल झाली. तेथे विश्रांती घेऊन दिंडी बसने कुसुमाग्रजनगरीकडे रवाना झाली.
----------
पालखीतील ग्रंथसंपदा
ग्रंथ दिंडीतील पालखीत श्रीमद भगवतगीता, ज्ञानेश्वरी, लिळाचरित्र, तुकाराम गाथा, भारतीय संविधान, ऋद्धीपूर चरित्र, महात्मा फुले समग्र वाड्मय, सकल ग्रंथ गाथा, विशाखा आदी ग्रंथांचा समावेश होता.
----------
महापाैरांकडून स्वागत, डॉ. आंबेडकर यांना अभिवादन
कुसुमाग्रज स्मारकातून निघालेली ग्रथदिंडी रामायण निवासस्थानासमोर येताच महापौर सतीश कुलकर्णी यांनी पुष्पांजली अर्पण करून दिंडीचे स्वागत केले. तर पुढे शिवाजी मार्गावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून दिंडी सार्वजनिक वाचनालयाकडे दाखल झाली.
-----------
रुसव्या, फुगव्यांची चर्चा
ग्रंथदिंडी सोहळ्यासाठी लोकहितवादी मंडळाचे पदाधिकारी, स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्यासह लोकप्रतिनिधी सकाळी साडेआठ वाजता कुसुमाग्रज स्मारकात दाखल झाले होते. मात्र, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित नव्हते. आयोजकांच्या मनमानी कारभारांमुळे ते दिंडीत सहभागी होणे टाळत असल्याची चर्चा रंगली होती. मात्र आयोजकांनी फोनाफोनी करून त्यांना बोलावून घेतल्यानंतरच ते उपस्थित झाले आणि त्यानंतर ग्रंथदिंडीचा शुभारंभ झाला.