गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुसे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 01:02 AM2019-03-13T01:02:55+5:302019-03-13T01:03:32+5:30
पेठरोडवरील शनिमंदिर परिसरात रात्रीच्या सुमारास गावठी कट्टे व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या तिघा संशयित आरोपींना पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हा शोध पथकाने अटक केली आहे त्यांच्याकडून एक गावठी कट्टा तसेच तीन जिवंत काडतुसे व दुचाकी असा जवळपास ६० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
पंचवटी : पेठरोडवरील शनिमंदिर परिसरात रात्रीच्या सुमारास गावठी कट्टे व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या तिघा संशयित आरोपींना पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हा शोध पथकाने अटक केली आहे त्यांच्याकडून एक गावठी कट्टा तसेच तीन जिवंत काडतुसे व दुचाकी असा जवळपास ६० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. सोमवारी (दि. ११) रात्री पंचवटी पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अयोध्यानगरी येथे राहणाऱ्या अनिकेत राजेश निंबाळकर, संकेत प्रकाश इंगळे तसेच पिंपळगाव बसवंत येथील तेजस नंदकिशोर जाधव या तिघांना अटक केली आहे.
याबाबत पंचवटी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सोमवारी (दि. ११) रात्रीच्या सुमाराला वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेखर, बाळा ठाकरे, अरुण गायकवाड, सुरेश नरवडे, महेश साळुंके, विष्णू जाधव, संतोष काकड, असे परिसरात गस्त घालत असताना पेठरोडवर तिघे संशयित दुचाकीवरून क्रमांक (एम.एच. १५. डी.डब्लू २५३०) येत असून त्यांच्या गाडीच्या डिक्कीत गावठी कट्टा तसेच जिवंत काडतुसे असल्याबाबत माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी त्या परिसरात सापळा रचला असता मिळालेल्या वर्णनावरून संशयित दुचाकीजवळ उभे असताना पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी केली त्यावेळी दुचाकीची डिक्की तपासली असता त्यात एक स्टिलची बॉडी असलेला गावठी कट्टा तसेच तीन जिवंत काडतुसे आढळून आले पोलिसांनी गावठी पिस्तूल, काडतुसे तसेच दुचाकी असा ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पंचवटी पोलिसात तिघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोघांचे मोबाइल हातातून पळविले
एबीबी सर्कल ते सिटीसेंटर मॉल रस्त्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दोघांचा मोबाइल हिसकावल्याची घटना रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी विजय महाकांत झा (४४, रा. अशोकनगर) यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात जबरी चोरीची फिर्याद दाखल केली आहे. दोघा अज्ञात चोरट्यांनी दुचाकीवरून येत झा यांच्यासह सनी शशीकांत येवलेकर या दोघांचे प्रत्येकी १२ हजार रु पयांचे मोबाइल हिसकावून पळ काढल्याचे फिर्यादित म्हटले आहे. चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.