रिमझिम पावसामुळे खरीप पिकांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:54 AM2018-08-20T00:54:18+5:302018-08-20T00:54:35+5:30
गेल्या पंधरवड्यापासून दडी मारून बसलेल्या वरुणराजाने दोन-तीन दिवसांपासून रिमझिम स्वरुपात हजेरी लावल्याने खरिपाच्या पिकांना तात्पुरते जीवदान मिळाले आहे. अक्षरश: होरपळून निघत असलेल्या आणि चारा म्हणून वापरता येईल अशी पिकांची अवस्था झाली होती.
मेशी : गेल्या पंधरवड्यापासून दडी मारून बसलेल्या वरुणराजाने दोन-तीन दिवसांपासून रिमझिम स्वरुपात हजेरी लावल्याने खरिपाच्या पिकांना तात्पुरते जीवदान मिळाले आहे. अक्षरश: होरपळून निघत असलेल्या आणि चारा म्हणून वापरता येईल अशी पिकांची अवस्था झाली होती.
अशातच अचानक वातावरणात बदल होऊन सलग दोन-तीन दिवस रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे दमदार पाऊस सुरू होईल अशी बळीराजाची अपेक्षा आहे. खरिपाला जीवदान मिळाले असेल तरीसुद्धा बळीराजाची चिंता कायम आहे. निम्मा पावसाळा संपत आला असताना अजून जोरदार पाऊस झालाच नाही. त्यामुळे विहीर, नाले कोरडे आहेत. याशिवाय खरिपाबरोबरच आगामी रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस होत असताना देवळा तालुक्यातील पूर्व भागात मात्र पाऊस झाला नाही.
या भागातील तीनही हंगामातील प्रमुख पीक कांदा आहे. अजूनही चांगला पाऊस नसल्याने कांदा लागवड लांबणीवर पडली आहे.
चणकापूर धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे गिरणा नदीला पूर आला आहे ; मात्र पूर पाण्याचा नदीकाठच्या गावांना फायदा होईल. इतर गावांतील शेतकऱ्यांची चिंता कायम आहे.
पावसाळ्याच्या उरलेल्या दिवसात पाऊस झाला नाही तर आगामी काळात दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकºयांसह सगळ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. श्रावण महिना सुरू असल्याने नागरिकांना पाऊस येईल अशी आशा होती. पूर्वी श्रावण महिन्यात संततधार पावसाने नागरिक त्रस्त होत असे. पण आता मात्र परिस्थिती बदलली आहे. सध्या थोड्याफार प्रमाणात कांदा लागवड केली जाते.