पावसामुळे खरीप पिकांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 06:22 PM2018-08-24T18:22:08+5:302018-08-24T18:23:13+5:30
गेल्या आठवड्यापूर्वी झालेल्या अल्प पावसाने तग धरुन असलेल्या खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. गेल्या दीड महिन्यांपासून ओढ दिलेल्या पावसाने गेल्या आठवड्यात हजेरी लावल्यानंतर समाधानचे वातावरण आहे.
वडनेर : गेल्या आठवड्यापूर्वी झालेल्या अल्प पावसाने तग धरुन असलेल्या खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. गेल्या दीड महिन्यांपासून ओढ दिलेल्या पावसाने गेल्या आठवड्यात हजेरी लावल्यानंतर समाधानचे वातावरण आहे.
तालुक्यातील काटवन परिसरात मोठ्या प्रमाणावर मका लागवड केली जाते. पावसाळ्यातील हुकमी पीक म्हणून मका पिकाकडे पाहिले जाते परंतु पावसाने दडी मारल्याने परिसरात चिंतेचे सावट पसरले होते. तग धरुन बसलेल्या पिकांना पावसामुळे जीवदान मिळाले असले तरी उत्पादनात घट होणार आहे.
गेल्या दीड महिन्यापूर्वी पाऊस नसल्याने शेतमजुरांच्या रोजीरोटीचा प्रश्नही ऐरणीवर आला होता. पिकांची निंदणी झाल्यानंतर वडनेरसह परिसरात पाऊस झाला नव्हता. परिणामी पिकांनी माना टाकायला सुरूवात केली होती. पावसाअभावी कोरडवाहू शेती धोक्यात सापडली होती.
सुमारे एक ते दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर पाऊस सक्रीय झाल्याने तग धरुन असलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. वडनेर परिसरात यंदा पावसाची सुरूवात चांगल्या प्रमाणात झाली होती. परंतु मध्यंतरी पावसाने ओढ दिली. वडनेर परिसरात प्रामुख्याने मका, बाजरी पिकांची पेरणी केली जाते. चांगला पाऊस होऊन पिके चांगली येतील अशी आशा शेतकऱ्यांना आहे.