पाण्यासाठी आलेल्या मोरांना मातोरीत जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:47 AM2019-05-16T00:47:28+5:302019-05-16T00:47:57+5:30
ग्रामीण भागात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, पशु-पक्षी व जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळणे मुश्किल झाले आहे.
मातोरी : ग्रामीण भागात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, पशु-पक्षी व जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळणे मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीत काही दिवासांपूर्वी मातोरी नजीकच्या डोंगराला लागलेल्या आगीमुळे जीव वाचवून पायथ्याशी पळालेल्या पशु-पक्ष्यांसाठी गावातील शंकर पिंगळे यांनी पिण्याचे पाणी व खाद्याची व्यवस्था केल्याने दररोज शेकडो मोर व विविध पक्षी याठिकाणी आश्रयास येत आहेत.
डोंगराळ भागातील पशु-पक्षी व जनावरे मानवी वस्तीकडे पाण्यासाठी वळू लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. परंतु मातोरी येथे वन्य पशु-पक्ष्यांची गरज ओळखून ती पूर्ण करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. काही दिवसांपूर्वीच मातोरी गावातील डोंगरावरील जंगलाला अचानक आग लागल्याने आगीपासून बचावासाठी तेथील पशु- पक्ष्यांनी अन्यत्र स्थलांतर केले. तर काहींनी पायथ्याशी असलेल्या शेतजमिनीकडे धाव घेतली. नेमकी हीच बाब शंकर पिंगळे या शेतकऱ्याच्या निदर्शनास आली.
पिण्याचे पाणी व खाद्यासाठी अनेक पक्षी फिरत असल्याचे पाहून पिंगळे यांनी आपल्या शेतातच प्रारंभी पाण्याची व खाद्याची सोय केली. सुरुवातीला दोन-चार दिवस त्याला प्रतिसाद मिळाला नाही, मात्र त्यानंतर दररोज सकाळी पक्ष्यांचे थवेच्या थवे याठिकाणी येऊ लागले. विशेष करून त्यात मोरांची संख्या अधिक असून, सकाळी पाणी व खाद्यासाठी येणारे हे पक्षी दिवसभर मात्र अन्यत्र जात असले तरी, सायंकाळनंतर पुन्हा शेतात परतू लागले आहेत. त्यांची संख्या पाहता, पिंगळे यांनी मळ्याच्या शेजारी मोरांना पिण्यासाठी टाकी भरून ठेवली, त्याचबरोबर खाद्य म्हणून दाणे, वाळलेली द्राक्षे, धान्य आदी वस्तू ठेवल्या आहेत. त्यामुळे या पक्ष्यांना सदरचा भाग सुरक्षित वाटू लागला आहे. विशेष म्हणजे विविध जाती-प्रजातींच्या पक्ष्यांचे जतन करण्यासाठी मातोरी गावात शिकाऱ्यांना बंदी घालण्यात
आली आहे.