वृत्तपत्र विक्रेत्यामुळे गाईला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 06:37 PM2019-09-17T18:37:56+5:302019-09-17T18:38:11+5:30
बसस्थानकात चार दिवसांपासून अत्यवस्थ असलेल्या गाईला वृत्तपत्र विक्रेते संजय साळुंके यांच्या भूतदयेने जीवदान मिळाले आहे.
पिंपळगाव बसवंत : येथील बसस्थानकात चार दिवसांपासून अत्यवस्थ असलेल्या गाईला वृत्तपत्र विक्रेते संजय साळुंके यांच्या भूतदयेने जीवदान मिळाले आहे. जुन्या बस स्टॅण्डमध्ये एक गाय निपचित बसलेली होती. चार दिवस कोणतीही हालचाल तिने केलेली नव्हती. साळुंके यांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी सहकारी पिंटु पवार, नीलेश सोनवणे यांच्या मदतीने गाईला उठविण्याचा प्रयत्न केला.
घटनास्थळी पशुवैद्य डॉ. अल्केश चौधरी, डॉ. सुरेश शेजवळ यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी गाईची तपासणी केली असता गाय गरोदर असल्याचे निदर्शनास आले. तसेच तीचे गोमुत्र व शेण अडकल्याने ती एकाच जागेवर बसून असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अर्धा तास उपचार केल्यानंतर गाईला मोकळे करण्यात आले. यानंतर गाय उभी राहून चालू लागली. हे दृष्ट पाहून साळुंके यांच्यासह उपस्थितांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.