हरसूल येथे पंतप्रधान मोदी यांच्या नावे पशुधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2022 02:02 AM2022-04-23T02:02:33+5:302022-04-23T02:02:56+5:30
येथील जनावरांच्या दवाखान्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेल्या दाखल्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ८७ गोधन, ११२ शेळ्या आणि ९५ कोंबडीवर्गामधील जनावरे असून महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रकरण दाखल करण्यासाठी हा दाखला दिल्याचे उघड झाले आहे.
हरसूल : येथील जनावरांच्या दवाखान्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेल्या दाखल्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ८७ गोधन, ११२ शेळ्या आणि ९५ कोंबडीवर्गामधील जनावरे असून महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रकरण दाखल करण्यासाठी हा दाखला दिल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, आपल्या कार्यालयातील कागदपत्रे गहाळ करून हा बोगस दाखला बनविला गेल्याचा आरोप पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला आहे. याबाबतचा अर्ज हरसूल पोलिसांना देण्यात आला आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून हा दाखला देण्यात आला असून त्याचा वापर महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचा लाभ मिळण्यासाठी करता येणार आहे. या दाखल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच नाव असून त्यांच्याकडे हरसूल येथे पशुधन असल्याचा उल्लेख या दाखल्यावर असून त्यावर अधिकाऱ्याची सहीही आहे.
या दाखल्यावरून बोगस कागदपत्रे तयार करून त्याच्या आधारे अनुदान घेतले जात असावे, अशी शंका व्यक्त होऊ लागली आहे. तसेच या मागे एखादे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
दरम्यान, या बाबीची खबर लागताच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयातून अज्ञात व्यक्तीने कागदपत्रे गहाळ करून त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव टाकून हा बनावट दाखला बनविल्याचे सांगितले आहे. तसेच कागदपत्रे गहाळ झाल्याबाबतचा अर्ज हरसूल पोलिसांकडे दाखल केला आहे. मात्र, त्यावर काय कारवाई झाली, याची माहिती मिळू शकली नाही.
कोट
मी बाहेर फिल्डवर असल्यावर शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून कोऱ्या दाखल्यावर सही करून ठेवली होती. ते दाखले आता गहाळ झाले असून त्याच्याच आधारे बनावट कागदपत्रे तयार केली असावीत.
डॉ. सुनील धांडे
पशुवैद्यकीय अधिकारी, हरसूल
कोट
मी दवाखान्याशेजारी राहतो. दवाखान्याबाहेर वरील दाखला खाली पडलेला आढळला. तशी कल्पना संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली होती, मात्र त्यांनी दखल घेतली नाही.
स्वप्नील शार्दूल, ग्रामस्थ हरसूल