नैसर्गिक जलस्रोत जिवंत; कारभाऱ्यांची इच्छाशक्ती मृत!

By अझहर शेख | Published: March 22, 2023 03:20 PM2023-03-22T15:20:54+5:302023-03-22T15:21:16+5:30

जागतिक जल दिन विशेष: नाशिकमधील पुरातन बारवांच्या वारसा धोक्यात!

Living natural water sources; The will of stewards is dead in nashik | नैसर्गिक जलस्रोत जिवंत; कारभाऱ्यांची इच्छाशक्ती मृत!

नैसर्गिक जलस्रोत जिवंत; कारभाऱ्यांची इच्छाशक्ती मृत!

googlenewsNext

नाशिक : आदिवासी भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाकडून ‘जलजीवन मिशन’ आणि जलयुक्त शिवारसारखे अभियान राबविले जात असले तरी दुसरीकडे मात्र नैसर्गिक जिवंत जलस्रोत संवर्धनाबाबत प्रशासकीय पातळीवर कमालीची उदासीनता दिसून येते. अहिल्यादेवी होळकरांच्या काळात जिल्ह्यात विविध ठिकाणी साकारलेल्या ऐतिहासिक देखण्या बारवांचा वारसा धोक्यात आला आहे. या बारवांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामधील भूजल पातळी आजही टिकून आहे. जागतिक जल दिनाच्या निमित्ताने या बारवांची स्वच्छता व जलसाठ्याचा पुनर्वापराचा संकल्प प्रशासनाने केल्यास खऱ्या अर्थाने जल दिन सार्थकी लागेल.

नाशिक शहरातील नांदुरनाकाजवळ महापालिका हद्दीत जुनी बारव आढळून येते. या बारवमधील भूजल पातळीदेखील शाबूत आहे. बारवची रचना उत्कृष्ट असून होळकरांच्या सत्ताकाळातील स्थापत्यशैलीचा अद्भूत नमुना या रूपाने बघावयास मिळतो. विटा व दगडांमध्ये चुनखडीचा वापर करून तयार करण्यात आलेली या मोठ्या बारवमध्ये उतरून जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या बारवची रचना अत्यंत सुंदर व देखणी आहे; मात्र दुर्दैवाने महापालिका प्रशासनाची नजर अद्यापही या बारवकडे पडलेली नाही. बारवच्या रूपाने नैसर्गिक जिवंत जलस्रोतचा चांगला पर्याय महापालिकेला उपलब्ध होऊ शकतो. ‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’ अशाप्रकारे लोकप्रबोधन करणाऱ्या मनपाने ही बारव वाचविली तरी मोठा जलस्रोताचे संवर्धन होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

१) नाशिक ग्रामीण भागातसुद्धा अशाच प्रकारच्या जुन्या बारव बघावयास मिळतात. यामध्ये अंजनेरी गावाच्या शिवारातील जुनी दगडी बारवदेखील संवर्धनाच्या प्रतीक्षेत आहे. या बारवमधील जलस्रोत अजूनही सुस्थितीत आहे. गरज आहे, बारव संवर्धनाची. याकडे प्रशासनाने लक्ष दिल्यास चांगल्या प्रकारचा जलस्रोत अंजनेरी पंचक्रोशीसाठी उपयोगात आणता येऊ शकतो.

२) त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मौजे तळवाडे शिवारातदेखील अशाचप्रकारे दगडी बांधकाम केलेली पायऱ्या असलेली जुनी बारव नजरेस पडते. या बारवमधील भूजल पातळी चांगली आहे. मात्र, याकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने संवर्धनाची प्रतीक्षा आहे.

३) गिरणारे गावातसुद्धा विटांचे बांधकाम असलेली भव्य जुनी बारव नजरेस पडते. या बारवचीही पाणीपातळी चांगली आहे. बारवची स्वच्छता अधूनमधून या भागातील ऐतिहासिक वारसाप्रेमींकडून केली जाते.

पाणीटंचाईच्या संकटावर होऊ शकते मात...!
नाशिक जिल्ह्यात हंगामी पर्जन्यमानाची स्थिती गेल्यावर्षी समाधानकारक राहिली आहे. यामुळे अजूनही जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांमध्ये पाण्याचे टँकर सुरू करण्याची वेळ भासलेली नाही. एप्रिल उजाडणार असला तरी पाणीटंचाईने अद्याप डोके वर काढलेले नाही. कारण आदिवासी तालुक्यांना अवकाळी पावसानेही मागील आठवडाभरापासून चांगलेच झोडपून काढले आहे. जिल्हा प्रशासनाकडून जरी पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला गेला असला तरी, दुसरीकडे मात्र नैसर्गिक जिवंत जलस्रोत संवर्धनाबाबतही पावले उचलण्याची गरज असल्याचे पर्यावरणप्रेमी व वारसाप्रेमी संस्थांचे म्हणणे आहे.

Web Title: Living natural water sources; The will of stewards is dead in nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.