राहत्या घरात पतीने पत्नीला जाळून ठार मारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 04:36 PM2018-06-14T16:36:22+5:302018-06-14T16:36:22+5:30
प्रकल्पाच्या ठेकेदाराने भिवंडी येथून या कुटुंबियाला वॉचमन म्हणून कामावर ठेवले होते. दरम्यान, एका वाटसरूने मंगळवारी रात्री ध्रुवनगर परिसरात वॉचमनच्या खोलीला आग लागल्याची माहिती गंगापूर पोलिसांना कळविली.
नाशिक : गंगापूररोडवरील ध्रुवनगर परिसरात एका गृहप्रकल्पाच्या साईटवर देखरेखीसाठी असलेल्या परप्रांतीय शाह दाम्पत्य राहत होते. संशयित पती समशेर अबलोश शाह याने पत्नी आयशा खातून शाह हिला ज्वलनशिल पदार्थ टाकवून मध्यरात्री पेटवून दिले. आगीमध्ये शंभर टक्के भाजल्याने आयशाचा मृत्यू झाला तर संशयित तिचा पती अबलोशदेखील भाजला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ध्रुवनगर परिसरातील मराठी शाळेजवळील एका बांधकाम व्यावसायिकाच्या गृहप्रकल्पावर वॉचमन म्हणून सदनिकेत राहणाऱ्या शाह कुटुंबिय मुळ बिहार राज्यातील आहे. अबलोश व आयशा या दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन वादविवाद झाले. मंगळवारी (दि.१२) मध्यरात्रीच्या सुमारास अबलोश याने पत्नीच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळून खून केला. दरम्यान, आगीची झळ बसल्याने संशयित समशेर काही प्रमाणात भाजल्याने त्याच्यावर जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरू आहे. गृहप्रकल्पाच्या ठेकेदाराने भिवंडी येथून या कुटुंबियाला वॉचमन म्हणून कामावर ठेवले होते. दरम्यान, एका वाटसरूने मंगळवारी रात्री ध्रुवनगर परिसरात वॉचमनच्या खोलीला आग लागल्याची माहिती गंगापूर पोलिसांना कळविली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले असता त्यांनी तत्काळ विजेरीच्या प्रकाशात खोलीत जाण्याच प्रयत्न केला असता प्रचंड धूर येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी अबलोश याची पत्नी आयशा पुर्णपणे भाजून मृत्यूमुखी पडल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यावेळी समशेर हा खोलीमध्ये आगीच्या ज्वालांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी इतरत्र पळत होता. पोलिसांनी तत्काळ त्याला सुरक्षितरित्या बाहेर काढून ताब्यात घेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याबाबत पोलिसांनी सखोल तपास केला असता कुठल्याही प्रकारची आग घरामध्ये लागलेली नव्हती तर मयत आयशाचा पती संशयित समशेर याने ज्वलनशील पदार्थाच्या सहाय्याने पत्नीला जाळून ठार मारल्याचे उघहकीस आले आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात दत्तात्रय लहानू माळी (५५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात संशयित अबलोशविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरिक्षक मोरे करीत आहेत.