देवळा तालुक्यातील लॉन्स बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 10:07 PM2020-03-19T22:07:23+5:302020-03-20T00:10:11+5:30
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात दि.१३ मार्चपासून साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू झाला असून, त्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी नाशिक यांनी अधिसूचना निर्गमित केली आहे. त्या अनुषंगाने देवळा तालुक्यात यात्रा, गर्दीचे उत्सव, लग्न समारंभासारख्या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून लॉन्स, मंगल कार्यालय आदी दि.३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार दत्तात्रेय शेजूळ यांनी दिली आहे.
देवळा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात दि.१३ मार्चपासून साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू झाला असून, त्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी नाशिक यांनी अधिसूचना निर्गमित केली आहे. त्या अनुषंगाने देवळा तालुक्यात यात्रा, गर्दीचे उत्सव, लग्न समारंभासारख्या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून लॉन्स, मंगल कार्यालय आदी दि.३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार दत्तात्रेय शेजूळ यांनी दिली आहे.
देवळा तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनस्तरावरून सर्व प्रयत्न सुरू आहेत. मंगळवारी (दि.१७) तहसीलदार दत्तात्रेय शेजूळ यांनी तालुक्यातील सर्व शासकीय विभागातील अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्यात तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.
विविध विभागांवर जबाबदारी सोपविण्यात आली. देवळा तालुक्यात अद्यापपर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नसला तरी ह्या विषाणूची लागण झालेले इतर भागातीत रुग्ण तालुक्यात लग्नसमारंभासाठी आले तर नागरिकांना त्याचा संसर्ग होऊन कोरोनाची साथ सर्वत्र पसरू
शकते.
यासाठी खबरदारी म्हणून तालुक्यातील सर्व लॉन्स, मंगल कार्यालये, मॅरेज हॉल आदी ठिकाणे गर्दी टाळण्यासाठी दि. १९ ते दि. ३१ मार्च २०२० पर्यंत कार्यक्रमांसाठी पूर्णत: बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. यामुळे या कालावधीत संबंधित ठिकाणी नियोजित असलेले सर्व समारंभ आता रद्द झाले आहेत. यामुळे ह्या कालावधीत लग्नसमारंभासाठी लॉन्स बुक केलेल्या वधूपित्यांपुढे मात्र मोठी समस्या निर्माण झाली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी कार्यक्रम पुढे ढकलणे किंवा छोट्या समारंभात लग्नसोहळा पार पाडण्याशिवाय दुसरा मार्ग शिल्लक नाही. देवळा तालुक्यात सुमारे २० लॉन्स आहेत.
दि.१९ रोजी आमच्या लॉन्सवर नियोजित लग्नसोहळा होणार होता. यासाठी वधू पक्षाने सर्व तयारी पूर्ण केली होती, परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी दि.१९ पासून लॉन्स बंद ठेवण्याचा आदेश प्राप्त झाल्यानंतर संबंधित वधूपक्षाकडील मंडळीशी मी चर्चा केली. त्यांच्यापुढे
सर्व परिस्थिती मांडली. कोरोना विषाणूचा धोका ओळखून त्यांनी समजदारी दाखवून लॉन्सवर होणारा विवाह सोहळा रद्द केला. बंदी काळात चार लग्नसोहळ्यांचे बुकिंग झालेले होते. आता हे समारंभ लॉन्सवर होणार
नाहीत. शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य पाऊल उचलले आहे.
- अशोक सूर्यवंशी, संचालक सत्यम लॉन्स, देवळा