स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर
By admin | Published: August 5, 2016 11:58 PM2016-08-05T23:58:17+5:302016-08-05T23:58:24+5:30
भाजपाचा नारा : कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शनं
सिन्नर : भारतीय जनता पार्टी आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढवेल व सिन्नरचे सर्वाधिकार माजी आमदार माणिकराव कोकाटे यांना राहतील, अशी घोषणा भाजपाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव यांनी केली.
नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने शहर व तालुका कार्यकारिणीची आढावा बैठक माजी आमदार कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित केली होती. आगामी पालिका निवडणूक पक्षाने स्वबळावर लढवावी, असा आग्रह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धरला. कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतल्यानंतर जाधव यांनी आपल्या भाषणात सदर घोषणा केली. माजी आमदार माणिकराव कोकाटे, भाजपाचे सरचिटणीस सचिन ठाकरे, बापू पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील केकाण यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
गेल्या पाच वर्षात कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली पालिका पदाधिकाऱ्यांनी अनेक विकासकामे केली. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच यश मिळले, असा आशावाद जाधव यांनी व्यक्त केला. पालिका निवडणुकीत उमेदवारी देताना कार्यक्षम कार्यकर्त्यांचा विचार केला जाईल व कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जाई असे ते म्हणाले. सिन्नरच्या विकासासाठी मुख्यमंत्री व पालक मंत्र्यांचे सहकार्य मिळत असल्याचे माजी आमदार कोकाटे यांनी सांगितले. सुमारे ८० कोटी रुपयांच्या पाणीयोजनेमुळे सिन्नरचा पाणीप्रश्न मार्गी लागणार असल्याचे कोकाटे म्हणाले. गेल्या दोन वर्षांपासून आपण आमदार नसतांनाही भाजपाच्या नेत्यांमुळे अनेक विकास-कामे आपण मार्गी लावल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्ष आश्विनी देशमुख, उपनगराध्यक्ष संजय नवसे, विठ्ठल उगले, सिंधूताई गोजरे, पद्माकर गुजराथी, गंगाधर वरंदळ, नगरसेवक नामदेव लोंढे, बापू गोजरे, मल्लू पाबळे, हर्षद देशमुख, सुजाता गाढे, उज्ज्वला खालकर, राजश्री कपोते, डॉ. प्रतिभा गारे, लता हिले, लता मुंढे, शीतल कानडी, मंगला जाधव, शहराध्यक्ष पंकज जाधव, सविता कोठूरकर, मंगल गोसावी, रामनाथ डावरे, बाळासाहेब हांडे, राजेंद्र कपोते यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)