स्थानिक रंगकर्मींना मिळणार शाबासकी
By Admin | Published: September 7, 2015 12:26 AM2015-09-07T00:26:32+5:302015-09-07T00:26:49+5:30
पुरस्कार योजना : नाट्य परिषदेचा निर्णय
नाशिक : ज्येष्ठ रंगकर्मींनी केलेल्या कार्याचे स्मरण चिरंतन राहावे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी या उद्देशाने त्यांच्या नावाने रंगभूमीवर उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या स्थानिक रंगकर्मींसाठी पुरस्कार योजना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने अध्यक्ष रवींद्र कदम आणि प्रमुख कार्यवाह सुनील ढगे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषित केली.
नाट्यपरिषदेच्या नाशिक शाखेची वार्षिक सभा रवींद्र कदम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी दरवर्षी रंगभूमीदिनी ज्येष्ठांच्या नावाने देणाऱ्या येणाऱ्या पुरस्काराच्या माध्यमातून स्थानिक रंगकर्मींना शाबासकी देण्याची योजना जाहीर करण्यात आली. त्यात दत्ता भट यांच्या नावाने पुरुष अभिनय, शांता जोग यांच्या नावाने स्त्री अभिनय, प्रभाकर पाटणकर यांच्या नावाने उत्कृष्ट दिग्दर्शन, रावसाहेब अंधारे यांच्या नावाने उत्कृष्ट नेपथ्य, बापूसाहेब काळसेकर यांच्या नावाने उत्कृष्ट रंगभूषा आणि गिरीधर मोरे यांच्या नावाने उत्कृष्ट प्रकाशयोजनेसाठी पुरस्कार देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे यांनी नाशिक शाखेच्या वाटचालीचा आढावा सभासदांसमोर ठेवला. शाखेची सदस्य संख्या १३०० वर जाऊन पोहोचली असून, महाराष्ट्र बॅँकेत ठेवीही १७ वरुन २९ लाखांवर जाऊन पोहोचल्याचे ढगे यांनी सांगितले. याचवेळी देणगीदार डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी अनंत कुबल एकांकिका स्पर्धेसाठी एक लाख रुपये तर महाराष्ट्र बॅँकेकडूनही एक लाख रुपये प्रायोजित केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी इंगळे, संजय गोसावी, सुरेश देवरे, अरुण रहाणे, श्याम दशपुते यांनी विविध सूचना केल्या. या सूचनांची दखल घेण्याचे कदम यांनी मान्य केले. सहकार्यवाह विजय शिंगणे यांनी इतिवृत्त वाचन, तर महेश डोकफोडे यांनी वार्षिक अहवाल सादर केला. वार्षिक हिशेब कोषाध्यक्ष रवींद्र ढवळे यांनी सादर केला. प्रवीण कांबळे यांनी आभार मानले.
यावेळी राजेंद्र जाधव, ईश्वर जगताप, आदिती मोराणकर, विवेक गरुड, दत्ता पाटील, विजय रावळ, प्रदीप पाटील आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)