स्थानिक कार्यकर्त्यांची होणार ‘महा’अडचण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 10:46 PM2019-12-15T22:46:03+5:302019-12-16T00:29:19+5:30
राज्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडीमुळे अन्य ठिकाणी राजकीय समीकरणे बदलली असली तरी सटाणा पालिकेत भाजप आणि शहर विकास आघाडीची युती असल्यामुळे महाविकास आघाडीचा पालिकेच्या राजकारणावर आजच्या घडीला फारसा परिणाम दिसून येत नाही. मात्र, आगामी काळात आजवर ज्या पक्षांविरोधात निवडणुका लढविल्या त्यांच्याच सोबत एकत्र बसण्याची वेळ आल्याने स्थानिक कार्यकर्त्यांची ‘महा’अडचण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नितीन बोरसे ।
सटाणा : राज्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडीमुळे अन्य ठिकाणी राजकीय समीकरणे बदलली असली तरी सटाणा पालिकेत भाजप आणि शहर विकास आघाडीची युती असल्यामुळे महाविकास आघाडीचा पालिकेच्या राजकारणावर आजच्या घडीला फारसा परिणाम दिसून येत नाही. मात्र, आगामी काळात आजवर ज्या पक्षांविरोधात निवडणुका लढविल्या त्यांच्याच सोबत एकत्र बसण्याची वेळ आल्याने स्थानिक कार्यकर्त्यांची ‘महा’अडचण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सटाणा नगरपालिकेची गेल्या तीन वर्षांपूर्वी निवडणूक झाली. थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना, कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस हे चारही पक्ष स्वबळावर लढत असताना जातीय समीकरणे जुळवत समता परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील मोरे यांनी शहर विकास आघाडी स्थापन करून रिंगणात उडी घेतली. भाजपकडून माजी नगराध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, शिवसेनेकडून माजी नगरसेवक अरविंद सोनवणे, कॉँग्रेसकडून माजी नगरसेवक विजय पाटील, राष्ट्रवादीकडून माजी नगरसेवक बाळासाहेब रौंदळ यांनी उमेदवारी केली होती. चारही पक्षांचे उमेदवार एकाच समाजाचे आणि भाऊबंदकी, एकमेकांच्या नात्यागोत्याचे असतानाही प्रचारात एकमेकांवर कमालीची चिखलफेक केल्याचे बघायला मिळाले, तर दुसरीकडे मोरे यांनी अल्पसंख्याकांची मोट बांधून नगराध्यक्षपद हासील केले होते.
अर्थात या निवडणुकीत ज्या त्या पक्षाच्या नेत्यांनी अंतर्गत कोणाला मदत केली हा संशोधनाचा भाग असला तरी गेल्या तीन वर्षांत अनेकवेळा पुलाखालून पाणी वाहून गेल्याचे बघायला मिळाले. राज्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडीमुळे वरिष्ठ नेते गळ्यात गळा घालून फिरत
असले तरी स्थानिक पातळीवर
चारही पक्षाचे कार्यकर्त्यांची तोंडे विरुद्ध दिशेला आहेत. त्यामुळे कोणत्याही पक्षाला ही महाविकास आघाडी फरशी फायदेशीर नसल्याचे चित्र आहे.
येत्या दोन वर्षांत सटाणा पालिकेच्या अध्यक्षासह सदस्यांची मुदत संपत आहे. त्यामुळे आगामी दोन वर्षांत होणाऱ्या निवडणुकीत ही महाविकास आघाडी टिकली आणि भविष्यात शिवसेना, कॉँग्रेस, राष्ट्रवादीने एकत्र निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतल्यास शहरात प्रभाव असलेल्या
राष्ट्रवादीने आपला उमेदवार म्हणून पुन्हा बाळासाहेब रौंदळ यांना पुढे केल्यास शिवसेनेचे अरविंद
सोनवणे, कॉँग्रेसचे विजय पाटील आणि त्यांचे नेते आपापल्या पक्षवाढीसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला ‘बाय’ देणार का, हा प्रश्नदेखील या निमित्ताने उपस्थित होतो. जर वरिष्ठ पातळीवर महाविकास आघाडी झालीच तर जागावाटपाचा अभूतपूर्व गोंधळ होऊन बंडखोरीची महाअडचण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शिवसेनेची फरफट
शिवसेनेकडे नेतृत्व करेल असा प्रभावी नेता नसल्यामुळे आजतरी पालिकेतील विरोधी बाकावर बसण्यासाठी प्रतिनिधी पाठवता आला नाही .याउलट राष्ट्रवादीत संजय चव्हाण आणि कॉँग्रेसमध्ये विजय पाटील, यशवंत पाटील यांच्या सारखी प्रभावी मंडळी आहे. त्यामुळे शिवसेनेच्या तुलनेत राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसला महाविकास आघाडी फायदेशीर ठरेल, असे चित्र सध्या तरी आहे. दुसरीकडे विरोधी पक्ष म्हणून भाजपला संघटनात्मक बांधणी करण्याची संधी मिळणार आहे. एकंदरीत या आघाडीत शिवसेनेची फरपट होणार आहे हे नक्की.
राष्टÑवादीच्या फुटीने संख्याबळ कमी
सटाणा पालिकेत शहर विकास आघाडी आणि भाजपची सत्ता आहे. चार महिन्यांपूर्वी पालिकेत, राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असल्यामुळे आपल्याला कामे करता येतील. राष्ट्रवादीचे गटनेते काका सोनवणे, शमीन मुल्ला या दोघांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केलाच आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे संख्याबळ कमी झाले आहे. त्यापाठोपाठ कॉँग्रेसचे गटनेते दिनकर सोनवणे यांनीदेखील कॉँग्रेस सोडून भाजपशी घरोबा केला. त्यामुळे भाजपमध्ये तीन नगरसेवकांची भर पडून ते सत्ताधारी बाकावर आहेत.
पक्षीय बलाबल
नगराध्यक्ष : शहर विकास आघाडी
शहर विकास आघाडी -६
भाजप - ८
राष्ट्रवादी - ४
कॉँग्रेस - १
अपक्ष - २