टॅँकर मंजुरीचे अधिकार स्थानिक पातळीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 06:17 PM2018-10-26T18:17:08+5:302018-10-26T18:17:58+5:30
सिन्नर तालुक्यात पहिल्यांदाच प्रथमच भयानक दुष्काळी स्थिती ओढावल्याचे पाहणी दौऱ्यात दिसून आले. दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनतेने एकत्रित येऊन त्यावर आपण मात करण्याची गरज आहे. टँकर सुरू करण्यासाठी उशीर लागू नये म्हणून टॅँकर मंजुरीचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात येणार असून, येत्या चार दिवसात त्यावर निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली.
सिन्नर : तालुक्यात पहिल्यांदाच प्रथमच भयानक दुष्काळी स्थिती ओढावल्याचे पाहणी दौऱ्यात दिसून आले. दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनतेने एकत्रित येऊन त्यावर आपण मात करण्याची गरज आहे. टँकर सुरू करण्यासाठी उशीर लागू नये म्हणून टॅँकर मंजुरीचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात येणार असून, येत्या चार दिवसात त्यावर निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली.
वावी, मुसळगाव या गावांमध्ये दुष्काळ पाहणी दौरा केल्यानंतर प्रा. राम शिंदे यांनी सिन्नर पंचायत समितीच्या सभागृहातील आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पंचायत समितीचे सभापती भगवान पथवे, उपसभापती जगन्नाथ भाबड, जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, नीलेश केदार, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड आदींसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनतेला दिलासा देण्यासाठी कामे करावी. टंचाई आराखडा तयार करताना त्यात त्रुटी ठेवू नका. दुष्काळाचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करावा, दुष्काळ गंभीर स्थितीत असल्याचा अहवाल राज्य सरकारला सादर करावा, शेतकºयांना पीकविम्याची भरपाई मिळेल असे नियोजन प्रशासनाने करावे, अपूर्ण पाणी योजना वेळेत पूर्ण करा, भविष्यात जनावरांनाही पाणी कसे उपलब्ध करता येईल याचाही निर्णय घेण्यात येईल, असे शिंदे यांनी बैठकीत सांगितले.
टँकरपासून कोणतीही वस्ती, गाव वंचित ठेवू नये असेही त्यांनी सांगितले. चारा छावण्या सुरू करून पशुधन वाचवण्यात येईल. टॅँकरवर जीपीएस यंत्रणा असेल तरच देयके देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. नरेगातून रस्ते होऊ शकतात. प्रत्येक गावात काम उपलब्धतेची माहिती चावडीवर लावण्याचे आदेश प्रा. शिंदे यांनी दिले.
बारागावपिंप्रीसह सात गावे योजना अजून अपूर्ण स्थितीत असून, त्यात त्रुटी असल्याने गावांना टँकरपासून वंचित ठेवू नये, अशी मागणी आमदार वाजे यांनी केली. तथापि, योजना सुरू असल्याची माहिती जीवन प्राधिकरण अधिकाºयांनी दिली. अधिकारी चुकीची माहिती देत असल्याचे आमदार वाजे यांनी निदर्शनास आणून दिल्याने योजनेची पाहणी आमदार वाजे यांच्यासह जिल्हाधिकारी आठ दिवसांत करतील, तशा सूचना प्रा. शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या.
तालुक्यात ५५० मिमी सरासरीच्या तुलनेत ४७ टक्के पाऊस झाल्याची माहिती तहसीलदार गवळी यांनी दिली. १३ गावांतील २२० पीक कापणी प्रयोगात ५० टक्क्यांपेक्षा उत्पादन कमी आल्याचे ते म्हणाले. पशुधन विभागाने चाराटंचाई जाणवणार असल्याचे सांगितले.
जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार यांनी पाणी योजनांचे देयके थकल्याने वीजजोडणी न करण्याची मागणी केली. त्यावर प्रा. शिंदे यांनी पाणी योजना व शेतकºयांची कृषीजोडणी न तोडण्याच्या सूचना केल्या. जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांनीही वीजजोडणीच्या प्रश्नावर आपली भूमिका मांडली.
आढावा बैठकीस उपविभागीय अधिकारी महेश पाटील, तहसीलदार नितीन गवळी, भाजपाचे गटनेते विजय गडाख, शिवसेनेचे गटनेते संग्राम कातकाडे,सदस्य रवींद्र पगार, सुमन बर्डे, नगराध्यक्ष किरण डगळे, दीपक खुळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील केकाण, शिवसेना तालुकाप्रमुख सोमनाथ तुपे, बाबासाहेब कांदळकर, विजय काटे, ज्ञानेश्वर पांगारकर, सहायक गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे, रामनाथ पावसे, रामनाथ डावरे, इलाहीबक्ष शेख, व्यंकटेश दुर्वास, ए. के. पाटील, लक्ष्मण बर्गे यांच्यासह कृषी, पाटबंधारे, पाणीपुरवठा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पशुधन, बांधकाम, वीज महावितरण आदींसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
भाजपा-शिवसेना सदस्यांची चकमक
आढावा बैठक सुरू झाल्यानंतर भाजपाचे गटनेते विजय गडाख यांनी पंचायत समितीतील अधिकारी पाणी नियोजनाची किंवा अन्य कोणतीही माहिती देत नसल्याची तक्रार केली. शिवसेनेचे उपसभापती जगन्नाथ भाबड यांनी सदर बैठक पंचायत समितीची नसल्याचे सांगितले. त्यावर भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील केकाण यांनी भाजपाच्या सदस्यांना माहिती देत नसल्याचा प्रकार गंभीर असल्याचे सांगितले. या आढावा बैठकीत भाजपा-सेना पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचे चित्र दिसून आले. शाब्दिक चकमकीनंतर प्रा. राम शिंदे उभय पक्षांच्या कार्यकर्त्यांना शांत केले.
टॅँकरच्या फेºयांवरून अधिकाºयांची भंबेरी
सिन्नर तालुक्यात किती टॅँकर सुरू आहेत व किती लोकसंख्येला पाणी पुरविले जाते, शंभर टक्के फेºया पूर्ण होतात का, असे अनेक सवाल प्रा. शिंदे यांनी आढावा बैठकीत अधिकाºयांना विचारले. त्यावर किती लोकसंख्येला पाणी पुरवले जाते यावर अधिकाºयांना ठामपणे उत्तर देता आले नाही. शिंदे यांच्या प्रश्नांच्या सरबत्तीमुळे सहायक गटविकास अधिकाºयांची चांगलीच भांबेरी उडाल्याचे चित्र होते. आढावा बैठकीत एवढी गडबड तर नियोजनात किती असेल, असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला.