एकाच रात्रीत घरे अन् दुकानांचे तोडले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 01:39 AM2019-03-05T01:39:57+5:302019-03-05T01:40:12+5:30
गावाच्या परिसरात चोरट्यांचा उपद्रव वाढला असून, रात्रीच्या वेळी बंद असलेल्या दुकानांसह गुदामांची कुलपे तोडून गावकऱ्यांच्या घरांनाही लक्ष्य केले आहे.
मातोरी : गावाच्या परिसरात चोरट्यांचा उपद्रव वाढला असून, रात्रीच्या वेळी बंद असलेल्या दुकानांसह गुदामांची कुलपे तोडून गावकऱ्यांच्या घरांनाही लक्ष्य केले आहे. येथील सुरेश पिंगळे यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्यामुळे त्यांनी संसारोपयोगी साहित्य पत्र्याच्या पडवीमध्ये स्थलांतरित केले होते. चोरट्यांनी पडवीत प्रवेश करून पत्र्याच्या पेटीतून सुमारे तीन लाखांचे दागिने लांबविल्याची घटना पहाटेच्या सुमारास लक्षात आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली.
मातोरीमध्ये चोरट्यांनी हैदोस घातला असून, ग्रामीण भागात चोरट्यांच्या वाढत्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. नाशिक तालुका पोलीस ठाणेअंतर्गत असलेल्या मातोरी, मुंगसरा, दुगाव, गिरणारे, चांदशी या गावांमध्ये चोरट्यांच्या वाढत्या उपद्रवाचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. मातोरीमधील सुरेश निवृत्ती पिंगळे यांच्या मळ्यात पत्र्याच्या पडवीमध्ये घुसखोरी करून अज्ञात चोरट्यांनी तीन लाखांचे दागिने, सात हजाराची रोकड लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. पहाटेच्या सुमारास पिंगळे यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलीस पाटलांना माहिती कळविली. त्यांनी त्वरित तालुका पोलिसांना माहिती दिली. यानंतर उपनिरीक्षक नेहेते यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.
याप्रकरणी पिंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गस्त थंडावली, चोरटे मोकाट
दरी-मातोरी परिसरात रात्रीच्या वेळी तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे. मागील अनेक महिन्यांपासून या भागात गस्त थंडावल्याने चोरट्यांसह अवैध धंदे करणाऱ्यांना रान मोकळे मिळाले आहे. मातोरी गाव हे शेतकरी व शेतमजूर क ष्टकºयांचे गाव म्हणून ओळखले जाते. दिवसभर काबाडकष्ट करून गाढ झोपी जाणाºया गावात रात्री चोरटे हैदोस घालत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
मातोरी गावात चोरट्यांनी पिंगळे यांच्या घरात हात साफ केल्यानंतर बंद दुकानांना लक्ष्य केले. रफिक कादरी यांच्या दुकानाचे कुलूप कटरने कापून दुकानातील किमती वस्तूंसह गल्ल्यातील सहा हजाराची रोकड लंपास केली. तसेच अन्य दोन दुकानांमध्येही चोरट्यांनी अशाच पद्धतीने चोरी करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्या दुकानांमधून रोकड हाती लागली नाही. गावात एकाच रात्री झालेल्या या धाडसी चोरीच्या घटनेने भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ‘जागते रहो’ असे गावकरी एकमेकांना सांगताना दिसून आले.