लॉकडाउनमुळे सलून व्यवसाय सापडला कैचीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 10:39 PM2020-04-07T22:39:18+5:302020-04-07T22:39:36+5:30
लॉकडाउन काळात अनेक व्यावसायिकांचे व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले आहेत. यामध्ये सलून व्यावसायिकांना मोठी झळ बसत असल्याने सलून व्यावसायिकांना केंद्र व राज्य शासनाने आर्थिक साहाय्य करण्याची मागणी कारागिरांकडून होत आहे.
वैतरणानगर : लॉकडाउन काळात अनेक व्यावसायिकांचे व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले आहेत. यामध्ये सलून व्यावसायिकांना मोठी झळ बसत असल्याने सलून व्यावसायिकांना केंद्र व राज्य शासनाने आर्थिक साहाय्य करण्याची मागणी कारागिरांकडून होत आहे.
सलून व्यावसायिकांचा ग्राहकांशी थेट संबंध येत असतो. कोरोना हा संसर्गजन्य असल्याने व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली आहे. ग्रामीण भागातही परिस्थिती सारखीच असून, राज्यातील सर्वच व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. नाभिक समाजाशी निगडित दशक्रिया, गंधमुक्ती असे विविध कार्यही बंदच असल्याने व्यावसायिकांचे आर्थिक स्रोत बिकट झाले आहेत. राज्यातील शहरी भागातील व्यावसायिकांचे स्वत:चे दुकान नसून भाडेतत्त्वावर असणाऱ्या व्यावसायिकांना भाडे कसे द्यायचे हा प्रश्न भेडसावत आहे. सलून व्यवसायामध्ये ग्रामीण भागातील कारागीर शहरी भागात जाऊन रोजंदारीवर व्यवसाय करतात. गेल्या काही दिवसांपासून या कारागिरांचे उपजीविकेचे साधनच ठप्प झाल्याने उपासमारीची वेळ आली आहे.
सलून व्यावसायिकांनी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आपले व्यवसाय बंद ठेवलेले असून, या कारागिरांची परिस्थिती बिकट झाली आहे. कारागिरांना आर्थिक मदत मिळणे गरजेचे असून, यासाठी नुकतेच विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे नाशिक महामंडळ व नाभिक समाजाच्या वतीने निवेदन देऊन आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली आहे.
- सुरेश सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष, नाशिक