लॉकडाऊनमुळे आईस्क्रीम उद्योग वितळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:14 AM2021-05-16T04:14:29+5:302021-05-16T04:14:29+5:30

सातपूर : मागील वर्षाप्रमाणेच या वर्षी देखील ऐन उन्हाळ्यात लॉकडाऊन झाल्याने आईस्क्रीम व्यवसाय पूर्णपणे कोलमडला आहे. उन्हाळ्यात आईस्क्रीमला मोठ्या ...

The lockdown has melted the ice cream industry | लॉकडाऊनमुळे आईस्क्रीम उद्योग वितळला

लॉकडाऊनमुळे आईस्क्रीम उद्योग वितळला

Next

सातपूर : मागील वर्षाप्रमाणेच या वर्षी देखील ऐन उन्हाळ्यात लॉकडाऊन झाल्याने आईस्क्रीम व्यवसाय पूर्णपणे कोलमडला आहे. उन्हाळ्यात आईस्क्रीमला मोठ्या प्रमाणात मागणी असते. ब्रँडेड उद्योगांबरोबरच हातगाड्यांवर व्यवसाय करणाऱ्या लहान, मोठ्या आईस्क्रीम विक्रेत्यांचेही कंबरडे मोडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मागील दोन महिन्यात सुमारे ५० ते ६० कोटी रुपयांचे नुकसान नाशिक जिल्ह्यातील आईस्क्रीम उद्योगांचे झाले आहे. राज्यातील उद्योगांना १५०० कोटी रुपये आणि देशातील आईस्क्रीम उद्योगांना १५ हजार कोटी रुपयांचा फटका बसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

कोरोना संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी मागील वर्षी आणि या वर्षीदेखील नेमका उन्हाळ्यात लॉकडाऊन करण्यात आला. त्याचा परिणाम उद्योग व्यवसायावर झाला आहे. उन्हाळ्याचे दिवस आले की,आईस्क्रीम व्यवसाय तेजीत येत असतो. ब्रँडेड मोठ्या उद्योगांबरोबरच लहान-मोठ्या गाड्यांवर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांनाही व्यवसाय मिळतो. उन्हाळा आणि आईस्क्रीम हे समीकरण झाले आहे. शहरात काही ब्रँड प्रसिद्ध दुकाने आहेत. तेथे आईस्क्रीम घेण्यासाठी अक्षरशः रांगा लागतात. गल्लोगल्ली,लहान-मोठ्या आईस्क्रीमच्या गाड्या बालगोपाळांसह आबालवृद्धांना खुणावत असतात. परंतु मागील वर्षीच्या लॉकडाऊनमुळे हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये बाजारपेठ पूर्ववत झाल्यानंतर या वर्षी चांगला व्यवसाय होईल अशी अपेक्षा होती. पण ही अपेक्षा फोल ठरली आहे. यावर्षी फक्त २० टक्केच व्यवसाय आहे. तोही ब्रँडेड आईस्क्रीमलाच आहे. स्थानिक पातळीवर उत्पादित होणाऱ्या आईस्क्रीमला मागणी नाही. दरवर्षी लग्नासाठी केटरर्सकडूनही आईस्क्रीमला मागणी असते. यंदा तीही नाही. शिवाय संचारबंदी लागू असल्याने नागरिकांना विनाकारण फिरण्यास, गर्दी करण्यास बंदी आहे. ग्राहकच नसल्याने हा व्यवसाय संकटात सापडला आहे. शिवाय कोरोनामुळे आरोग्याची काळजी घेतली जात आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून थंड, आंबट खाणे टाळले जात आहेत. त्याचाही फटका बसल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

इन्फो==

देशात गुजरातमध्ये आईस्क्रीमची सर्वाधिक विक्री होते. दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र,नवी दिल्ली तर पाचव्या क्रमांकावर कर्नाटकचा नंबर लागतो. आईस्क्रीमची विक्री वर्षभर होत असते.पण 'मार्च ते मे तीन महिने हंगाम असतो. याच हंगामात लॉकडाऊन होण्याचे हे दुसरे वर्ष आहे. या उद्योगावर अवलंबून असलेल्या अन्य 50 उद्योगांवरही मंदीचे सावट पसरले आहे.

इन्फो==

देशाच्या एकूण जीडीपीत ५ टक्के हिस्सा डेअरी उद्योगाचा आहे. आईस्क्रीम उद्योगाला लागणारा कच्चा माल जसे दूध, दूध पावडर, क्रीम, बटर, खवा हे डेअरी उद्योगापासून मिळतात. तरीपण जीएसटीमध्ये डेअरी उद्योगाचा समावेश ५ टक्के, तर आईस्क्रीम उद्योगाला १८ टक्के कर लावण्यात आला आहे. आईस्क्रीम उद्योगाला फूड इंडस्ट्री किंवा डेअरी इंडस्ट्रीमध्ये समाविष्ट करण्यात यावे.

-आशिष नहार,राष्ट्रीय पदाधिकारी आईस्क्रीम संघटना

(फोटो १५ नहार)

Web Title: The lockdown has melted the ice cream industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.