लॉकडाऊनमुळे महागडे बीट बनले जनावरांचा चारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:11 AM2021-05-28T04:11:56+5:302021-05-28T04:11:56+5:30
दऱ्हाणे शिवारातील रामदास बगडाणे यांनी आपल्या एक एकर शेतात गेल्या चार महिन्यांपूर्वी बीटची लागवड केली होती. चार महिन्यांत त्यांनी ...
दऱ्हाणे शिवारातील रामदास बगडाणे यांनी आपल्या एक एकर शेतात गेल्या चार महिन्यांपूर्वी बीटची लागवड केली होती. चार महिन्यांत त्यांनी पिकाला दिवसरात्र पाणी देऊन निंदणी, खुरपणी करून मोठ्या कष्टाने बीटचे उत्पादन घेतले. टरबुजाच्या आकाराचे बीट फळ प्रत्येकाचे आकर्षण बनले. हे फळ बघण्यासाठी ठिकठिकाणाहून शेतकरी बगडाणे यांच्या शेतात येत होते. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि शासनाने लॉकडाऊन जाहीर केले. यामुळे भाजीपाला लिलाव बंद झाले, तर वाहतुकीवरही बंधने आल्याने भाजीपाला वाहतूक थांबली. त्यामुळे बाजारभावावर मोठा परिणाम झाला. अनेक व्यापाऱ्यांना बीट फळाबद्दल माहिती देऊनही कोरोनाच्या निर्बंध आणि बाजारभावाची शाश्वती नसल्याने त्यांनी फळ विकत घेण्यास नकार दिला. सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या या फळाच्या उत्पादनासाठी बगडाणे यांनी सोसायटीचे लाखो रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, कोरोना काळामुळे बियाणे, निंदणी, खुरपणी, मशागत, वारंवार पाणी देणे आदींसाठी केलेला मोठा खर्चही वाया गेला आहे. उत्पादन खर्चाइतकाही बाजारभाव मिळत नसल्याने ते मोठ्या संकटात सापडले आहेत. सध्या बगडाणे कर्जबाजारी असून कर्ज फेडायचे कसे या विवंचनेत ते आहेत.
इन्फो...
कोरोना निर्बंध आणि बाजारभाव नसल्याने त्यांना तयार माल बाजारातच नेता आला नाही. त्यामुळे नाईलाजाने त्यांनी हाती आलेले बीट फळ जनावरांना चारा म्हणून टाकून दिले. स्थानिक बाजारात त्याला मागणी नाही. शहरात विक्रीसाठी नेता येत नाही. स्थानिक व्यापारी मातीमोल दराने मागत असल्यामुळे पीक शेतातच खराब होऊ लागले आहे. शेतातील या काढणीयोग्य बीट फळाच्या खरेदीची व्यवस्था शासनाने करावी अथवा या पिकाचे पंचनामे करून शासनाकडून भरपाई मिळण्याची मागणी बगडाणे यांनी केली आहे. लॅाकडाऊनमध्ये शेतकऱ्याचा माल पिकला तरी वाहतुकीची परवानगी मिळत नाही. परवानगी घेतली तर बाजारात व्यापारी ग्राहक नसल्याने भाव पाडून मागतात. अशा दुहेरी स्थितीत शेतमालाला भाव मिळत नाही. उत्पादन खर्चही निघत नसल्याने भाजीपाला उत्पादक सध्या मोठ्या अडचणीत सापडला आहे. भाजीपाला व फळे नाशवंत असल्याने त्याला तातडीने बाजारपेठ उपलब्ध करून देणे आवश्यक होते; पण तसे झालेले नाही.
कोट...
माझ्या एकरभर क्षेत्रावर बीट फळाच्या उत्पादनासाठी आजपर्यंत एक लाख वीस हजार रुपये खर्च केला. एकूण चौदा टन माल निघून सात लाख रुपयांपर्यंत उत्पन्न अपेक्षित होते. मात्र, माल सुरू होताच लॉकडाऊन लागले. लवकरच परिस्थिती सुरळीत होईल म्हणून माल काढला नाही. अशा परिस्थितीत अपेक्षित बाजारपेठ मिळत नसल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
- रामदास बगडाणे, शेतकरी, दऱ्हाणे
फोटो - २७ सटाणा १
टरबुजाच्या आकाराचे दोन किलो वजनाचे बीट फळ दाखवताना रामदास बगडाणे, तर भाव मिळत नसल्याने नाइलाजाने हे फळ जनावरांना खाऊ घालावे लागत आहे.
===Photopath===
270521\27nsk_18_27052021_13.jpg
===Caption===
टरबूजाच्या आकाराचे दोन किलो वजनाचे बीट फळ दाखवताना रामदास बगडाणे तर भाव मिळत नसल्याने नाइलाजाने हे फळ जनावरांना खाऊ घालावे लागत आहे.