स्वयंस्फूर्तीने काळजी घेतली, तरच लॉकडाऊन टळेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:29 AM2021-02-21T04:29:10+5:302021-02-21T04:29:10+5:30
नाशिक : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा उपचार घेत असलेल्या रुग्णांचा सर्वाधिक आकडा साधारण सप्टेंबरमध्ये अकरा हजारांच्या जवळपास होता. तो आकडा एक ...
नाशिक : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा उपचार घेत असलेल्या रुग्णांचा सर्वाधिक आकडा साधारण सप्टेंबरमध्ये अकरा हजारांच्या जवळपास होता. तो आकडा एक हजारपर्यंत खाली आला असताना गेल्या केवळ दोन ते तीन दिवसांमध्ये त्यामध्ये दोनशे ते तीनशेने वाढ झाली. आज आकडा १ हजार ५४४ वर पोहोचलेला आहे. कोरोनाचा हा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वतःहून जास्तीत जास्त काळजी घेणे आवश्यक आहे, तरच लॉकडाऊन टळू शकेल, असे स्पष्ट मत असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केले आहे.
कोरोनाबाधितांची संख्या कमी- अधिक होत असल्याने आणि राज्याच्या काही भागांत कोराेनाबाधितांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊनची चर्चा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये संसर्गामध्ये खूप लक्षणीय वाढ होताना दिसून येते आहे. गेल्या वर्षी २८ मार्च रोजी आपल्याकडे कोरोनोचा फक्त एक रुग्ण होता आणि त्यावेळी संपूर्ण लॉकडाऊन होते; पण आज आपल्याकडे पंधराशे रुग्ण आहेत. अशा वेळेला आपण पंधराशेपट काळजी घ्यायला हवी, असेही ते म्हणाले.
इन्फो..
कार्यक्रम ऑनलाइनच करा
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी सामाजिक कार्यक्रमात थेट सहभागी होण्यापेक्षा सोशल मीडियाद्वारे संबंधित कार्यक्रमांचा आनंद घ्यावा. असे केल्याने कोरोनाचा संसर्ग तर रोखता येईलच, याशिवाय आपण आपली सामाजिक जबाबदारीही पार पाडू शकतो, तसेच जेथे आपली उपस्थिती अनिवार्य असेल, अशा ठिकाणी कोरोनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले.