बंगल्याचे कुलूप उघडून पळविले ५१ लाखांच्या दागिण्यांचे लॉकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 05:21 PM2020-01-28T17:21:33+5:302020-01-28T17:27:39+5:30
गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहाशेजारी असलेल्या रोमेश विजय लुथरा (३६) यांचा आनंदव्हिला नावाचा बंगला आहे. या बंगल्यात ते आपल्या कुटुंबियांसमवेत राहतात. सोमवारी संध्याकाळच्या सुमारे रोमेश हे त्यांच्या पत्नीसह आईला दवाखान्यात घेऊन कॉलेजरोडला गेले.
नाशिक : शहर व परिसरात घरफोडी, जबरी लूट, खंडणी वसूलीसारख्या गुन्ह्यांचे प्रमाण अलिकडे वाढले आहे. वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास आयुक्तालयस्तरावरील पोलीस यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे बोलले जात आहे. आयुक्तालयासह सरकारवाडा पोलीस ठाण्यापासून काही मीटर अंतरावर असलेल्या आनंदव्हिला बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी दागिणे, रोकड असलेली गोदरेज कंपनीची लोखंडी तिजोरी हातोहात पळविली. या घरफोडीत सुमारे ५० लाखांचे दागिणे व १ लाखाची रोकड असा एकूण ५१ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लूटून नेल्याची घटना सोमवारी (दि.२८) रात्री उघडकीस आली.
गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहाशेजारी असलेल्या रोमेश विजय लुथरा (३६) यांचा आनंदव्हिला नावाचा बंगला आहे. या बंगल्यात ते आपल्या कुटुंबियांसमवेत राहतात. सोमवारी संध्याकाळच्या सुमारे रोमेश हे त्यांच्या पत्नीसह आईला दवाखान्यात घेऊन कॉलेजरोडला गेले. पावणेदहा वाजेच्या सुमारास लुथरा हे आपल्या आई, पत्नीसह घरी परतले असता घराचे कुलूप उघडून त्यांनी आतमध्ये प्रवेश केला. त्यांच्या आईने जेव्हा आपल्या बेडरूममधील कपाट उघडले तेव्हा, कपाटात ठेवलेले लॉकर गायब असल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ ही बाब आपल्या मुलाला सांगितली. रोमेश यांनी बेडरूममध्ये जाऊन खात्री केली असता तिजोरी चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. रोमेश यांनी त्वरित घटनेची माहिती पोलिसांना कळविली. काही मिनिटांतच पोलीसांनी घटनास्थळ गाठले. तत्काळ पोलिसांनी बेडरूममधील कपाटाचा पंचनामा केला. श्वान पथकासह न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या पथकालाही पाचारण करण्यात आले. रोमेश यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात संशयितांविरूध्द घरफोडीचा गुन्हा सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा पत्ताच नाही
बंगल्यात किंवा आवारात एकही सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. यामुळे गुन्ह्याचा छडा लावण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांपुढे निर्माण झाले आहे. संपुर्ण बंगल्याच्या परिसरात किंवा बाहेरदेखील सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे या गुन्ह्याबाबतचा कुठलाही सुगावा मंगळवारी उशिरापर्यंत पोलिसांना लागलेला नव्हता.