जिल्हा बँकेला ठोकले कुलूप

By admin | Published: February 3, 2017 12:35 AM2017-02-03T00:35:03+5:302017-02-03T00:35:56+5:30

कर्मचाऱ्यांना कोंडले : रक्कम मिळत नसल्याने ग्रामस्थांचा संताप

Locked to the District Bank | जिल्हा बँकेला ठोकले कुलूप

जिल्हा बँकेला ठोकले कुलूप

Next

नगरसूल : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत दररोज फेऱ्या घालूनही खात्यात असणारी हक्काच्या कमाईची रक्कम मिळत नसल्याने येथील संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांना कोंडून शाखेला कुलूप ठोकले.
नोटाबंदीचा परिणाम प्रामुख्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. नोटाबंदीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली असून, शेतकऱ्याची जिव्हाळ्याची जिल्हा बँक व सहकारी पतसंस्थेत नोटाबंदीच्या निर्णयानंतर आजपर्यंत नगरसूल जिल्हा बँकेत दोन हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे दिले नाहीत. महिन्यात साधारण सात ते आठ वेळा पैसे येतात तेही दिवसाला लाख दोन लाख. त्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी रांगा लावून असतात. त्यामध्ये काही शेतकऱ्यांना पैसे मिळतात तर काहींना पैसे संपल्यामुळे रिकाम्या हाती परतावे लागते, अशी परिस्थिती नेहमीची झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी अखेर बँकेला कुलूप लावून कर्मचाऱ्यांना कोंडले.
शेतमालाचे चेक महिना-दीड महिना होऊनही खात्यात जमा होत नाहीत. माल विक्रीनंतर व्यापारी त्यांच्या सोईने तारखा टाकतात. त्या तारखेनंतर बँकेत चेक भरायचा आणि चेक भरल्यानंतर महिन्याने चौकशी केली तरी चेक जमा झालेला नसतो. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. शेतमाल विक्रीनंतर तब्बल दोन महिन्याने शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होतात. याबाबत रिझर्व्ह बँकेने चौकशी करावी, अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी विकासो माजी अध्यक्ष सुभाष निकम, माधव बागुल, दत्तू धनवटे, प्रकाश वाघ, दत्तू नागरे, अर्जुन मुंढे, विठ्ठल सानप, वामन बारे, विनायक निकम, श्रावण पवार, विजय गायकवाड यांच्यासह २०० शेतकरी उपस्थित होते.
चलन तुटवड्यामुळे दैनंदिन व्यवहारावर परिणाम झाला असून, बाजारपेठ ओस पडल्या आहेत. शेतकरी त्रस्त झाला आहे. शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांना आठवड्याला पगार करावा लागतो. पण आठवड्यापासून बँकेचे उंबरठे झिजवूनदेखील पैसे मिळत नाही. बँकेने तर बँकेबाहेर पैसे नसल्याचा फलक लावला आहे.
पैसे उपलब्ध नसल्याने व्यवहार बंदचा फलक पाहून लोक माघारी जातात आता मजुरांना काय सांगायचे हा प्रश्न शेतकऱ्याना पडला आहे. मजूर म्हणतात बाजार करण्यासाठी तर द्या, बाकीचे नंतर द्या. नोटाबंदीमुळे जनतेला मोठा त्रास होत असून, त्याचा परिणाम
बाजार पेठातील किराणा दुकान, कापड दुकान, हार्डवेअर,
जनरल स्टोअर, हॉटेलसह अनेक दुकानदार फक्त बसून आहेत. (वार्ताहर)

Web Title: Locked to the District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.