मालेगावी जिल्हा बॅँक शाखेला ठोकले कुलूप
By admin | Published: April 19, 2017 11:01 PM2017-04-19T23:01:59+5:302017-04-19T23:02:16+5:30
निवेदन : जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीचे आंदोलन
मालेगाव : शिक्षकांचे वेतन शासनाने अदा करूनही येथील जिल्हा बॅँकेच्या सोमवार बाजारातील शाखा वेतन अदा करण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीच्या पदाधिकारी व शिक्षकांनी येथील जिल्हा बॅँकेच्या सोमवार बाजार शाखेला कुलूप ठोकले, तर माळमाथा परिसरातील मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी झोडगे जिल्हा बॅँक शाखेच्या शाखाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
शासन शिक्षकांचे वेतन अदा करीत असताना जिल्हा बॅँकेच्या शाखांकडून शिक्षकांना वेतन दिले जात नाही. खात्यावर जमा झालेल्या रकमेपैकी अर्ध्यापेक्षा कमी रक्कम दिली जात आहे. परिणामी शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. यामुळे संतप्त झालेल्या जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवार बाजारातील शाखेला कुलूप ठोकले तर झोडगे येथील शिक्षकांनी जिल्हा बॅँकेच्या कारभाराचा निषेध करीत शाखाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
मालेगावच्या आंदोलनात आर. डी. निकम, एस. पी. खैरनार, वाय. के. खैरनार, सी.एस. बागुल, संजय वाघ, एम.आर. बच्छाव, श्रीमती साधना पवार, बी.ए. डांगळे, भिका मंडळ, राजेंद्र शेवाळे आदिंसह शिक्षक सहभागी झाले होते, तर झोडगे येथे झालेल्या आंदोलनात मुकुंद थोरात, कमलाकर देसले, एस.डी. फरस, जे.जे. निकम, मधु भांडारकर, के.ए. देसले, पी. डी. चौधरी, एस. डी. बोरसे आदिंसह शिक्षक, कर्मचारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)