बंद घरांचे कुलूप तोडले; सहा लाखांचा ऐवज लुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 05:04 PM2020-02-22T17:04:28+5:302020-02-22T17:07:04+5:30
नाशिक : गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी झालेल्या घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे ५ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा ऐवज ...
नाशिक : गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी झालेल्या घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे ५ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटल्याचे समोर आले आहे. या दोन्ही घटना सिरीन मेडोज, पारिजातनगरसारख्या उच्चभ्रू वसाहतींमध्ये घडल्या असून, याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गंगापूररोडवरील सिरीन मेडोज भागातील यशश्री बंगल्यात राहणारे मधुकर रामचंद्र भंडारी (७६) व त्यांचे शेजारी किशोर खैरनार यांच्या बंद घरांमध्ये स्वयंपाकगृहाद्वारे खिडकीचे गज वाकवून अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. चोरट्यांनी या दोन्ही घरांमधून सोन्या-चांदीचे दागिने, चांदीची भांडी, रोख रक्कम असा सुमारे पाच लाख ४२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे भंडारी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
दुसऱ्या घटनेत कॉलेजरोडवरील पारिजातनगर येथील योगेश मुरलीधर शिरवाडकर (४५) यांच्या बंद घराचे कुलूप चोरट्यांनी तोडून घरात प्रवेश केला. घरातील देवघरात ठेवलेल्या गोदरेजच्या लोखंडी कपाटात ठेवलेले ५५ हजारांचे दागिने, रोख रक्कम चोरट्यांनी घेऊन पोबारा केला. या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बंद घरे चोरट्यांकडून लक्ष्य केली जात असल्याने पोलिसांच्या गस्तीविषयीदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या दोन्ही घटना दिवसा घडल्या आहेत, हे विशेष! घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. बंद घर दिसले की फोडले, असाच जणू कित्ता चोरट्यांकडून गिरविला जात असल्याचे या भागातील ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले.
चारचाकीसह तीन दुचाकी लंपास
आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जेजूरकर मळ्याशेजारी सचिन सुभाष दुसाणे (वय ४१, रा.कासारवाडी पुणे) यांनी त्यांच्या मालकीची मारुती स्विफ्ट डिजायर (एम.एच.१४ इएच ६७५५) अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली. तसेच भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील शालिमार परिसरातून मंगेश जयंत चार्वेकर (वय ३२, रा.जनरल वैद्यनगर, द्वारका) यांच्या मालकीची होंडा युनिकॉर्न दुचाकी (एम.एच.१५ डीवाय २५३५) अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिसºया घटनेत पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील मालेगावस्टॅन्डवरून कैलास भास्कर बरकले (४०, रा.टाकळीरोड) यांची अॅक्टिवा दुचाकी (एमएच १५ जीयू ८५३०) अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. चौथी घटना मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीतील वडाळारोडवर घडली. कय्युम दिलावर खान (६२, रा.बॉबी बंगला, साईनाथनगर) यांची अॅक्टिवा दुचाकी (एमएच १५ एफडी ०९३३) ही त्यांनी वडाळारोडवरील एका लॉन्सबाहेर उभी केली असता चोरट्यांनी ती गायब केली.
अंबडला दोन लाखांचे रेडिमेड कपडे लंपास
अंबड पोलीस ठाणे हद्दीतील बंदावणेनगर कामटवाडा येथील ‘स्टाइल बेबिजिटर वेल’ नावाने रेडिमेड कपड्यांचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १ लाख ९७ हजार ५०० रूपयांचे कपडे चोरी केले आहे. योगेश सुरेश मेतकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.