पादचाऱ्याची लूट करणाऱ्या तोतया पोलिसाला ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 04:37 PM2019-06-16T16:37:57+5:302019-06-16T16:42:47+5:30
पादचा-याला अडवून त्याचा हात घट्ट पकडून ‘तू येथे चो-या करण्यासाठी आला आहे का? तुला पोलीस स्टेशनला जमा करतो’ असा दम भरला. त्यानंतर त्या युवकाला पंडित कॉलनीमध्ये फिरवून अंधाराच्या ठिकाणी घेऊन जात ‘मी तुझ्यावर गुन्हा दाखल करणार नाही’ असे सांगत ५० हजारांची मागणी केली.
नाशिक : शरणपूररोडवरील राजीव गांधी भवनजवळ एका पादचारी युवकाला पाठीमागून येऊन हात धरत तोतया पोलिसाने दमबाजी व मारहाण करून दहा हजाराची रोकड बळजबरीने काढून घेतल्याची घटना शुक्रवारी (दि.१४) घडली होती. या घटनेची माहिती तत्काळ सरकारवाडा पोलिसांना मिळताच पोलिसांनी पंडित कॉलनीमधून तोतया पोलिसाला रात्रीच अटक केली.
याबाबत सरकारवाडा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एका अज्ञात इसमाने रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास एका पादचा-याला अडवून त्याचा हात घट्ट पकडून ‘तू येथे चो-या करण्यासाठी आला आहे का? तुला पोलीस स्टेशनला जमा करतो’ असा दम भरला. त्यानंतर त्या युवकाला पंडित कॉलनीमध्ये फिरवून अंधाराच्या ठिकाणी घेऊन जात ‘मी तुझ्यावर गुन्हा दाखल करणार नाही’ असे सांगत ५० हजारांची मागणी केली. युवकाने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तोतया पोलिसाने बळजबरीने त्याच्या पॅन्टच्या खिशातून १० हजार रुपये काढून घेत मारहाण करून पोबारा केला. यानंतर युवकाने त्वरित घडलेला प्रकार भावाला मोबाइलवरून सांगितला. या युवकाचा भाऊ पंडित कॉलनीत आल्यानंतर त्याने तत्काळ सरकारवाडा पोलिसांची मदत मागितली. पोलिसांना सोबत घेऊन परिसरात गस्त सुरू केली असता तोतया पोलीस भामटा संशयित देवेंद्र लक्ष्मण निकम (रा. चांदवड) यास पंडित कॉलनीतून ताब्यात घेतले. पोलिसांनी ‘खाकी’चा हिसका दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून युवकाचे दहा हजार रुपये रोख, आधार कार्ड असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी युवकाच्या फिर्यादीवरून निकम याच्या विरुद्ध जबरी लुटीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सरकारवाडा पोलीस करत आहेत.