नाशिकच्या उमेदवारीची माळ हेमंत गोडसे यांच्या गळ्यात; दीड महिन्याचा घोळ संपला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 06:31 AM2024-05-02T06:31:56+5:302024-05-02T06:32:47+5:30
गोडसे हे चौथ्यांदा लोकसभा निवडणूक रिंगणात उतरणार असून, आता त्यांचा सामना उद्धवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्याशी रंगणार आहे.
नाशिक : तब्बल दीड महिन्याच्या घोळानंतर अखेरीस नाशिकच्या जागेचा तिढा महायुतीने सोडवला असून, शिंदेसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली आहे.
गोडसे हे चौथ्यांदा लोकसभा निवडणूक रिंगणात उतरणार असून, आता त्यांचा सामना उद्धवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्याशी रंगणार आहे. तब्बल दीड महिने नाशिकची जागा शिंदेसेना, भाजप की, राष्ट्रवादीला मिळणार या विषयावर खल सुरू होता. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत आल्यानंतर स्पर्धा अधिकच तीव्र झाली होती. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाल्यानंतरही महायुतीचा उमेदवार घोषित नसल्यामुळे हा चर्चेचा विषय बनला होता.
मात्र, गेल्या दोन दिवसांपासून राजकीय हालचाली गतिमान झाल्या. मंगळवार दिवसभर भाजपचे नेते गिरीष महाजन हे नाशिकमध्ये तळ ठोकून होते, तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील नाशिकमध्ये येऊन बैठका घेतल्या. गिरीष महाजन यांनी छगन भुजबळ, तसेच माधवगिरी महाराज यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला, तर बावनकुळे यांनीदेखील बुधवारी छगन भुजबळ यांची भेट घेतली होती. चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिकच्या जागेवरील भाजपचा दावा आता नसल्याचे सांगून ही जागा शिवसेनेकडे राहील, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर अपेक्षेनुसार विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना शिंदेसेनेने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांची उमेदवारी जाहीर होताच फटाक्यांची आतषबाजी करून समर्थकांनी जल्लोष केला. हेमंत गोडसे यांनी २००९ मध्ये प्रथम मनसेकडून राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवली. त्यात त्यांचा २७००० मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर २०१४ आणि २०१९ मध्ये सलग दोन वेळा ते निवडून आले आहेत. २०१४ मध्ये त्यांनी छगन भुजबळ यांचा पराभव केला होता, तर २०१९ मध्ये माजी खासदार समीर भुजबळ यांचा त्यांनी पराभव केला होता. आता त्यांचा सामना उद्धवसेनेचे राजाभाऊ वाजे यांच्याशी होणार आहे.
दिंडाेरीत जाेरदार शक्तिप्रदर्शन
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार डॉ. भारती पवार तसेच नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिंदे सेनेचे उमेदवार हेमंत गोडसे हे शक्तिप्रदर्शन द्वारे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महायुतीचे अन्य नेते उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ऐवजी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हेच या मिरवणुकीत सहभागी होण्याची शक्यता आहे.