नाशिकमध्ये मोठा ट्विस्ट! राष्ट्रवादीचा उमेदवारीवर दावा कायम; छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 02:18 PM2024-04-23T14:18:47+5:302024-04-23T14:22:11+5:30
Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघावरुन महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघावरुन महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. गेल्या काही दिवसापूर्वी मंत्री छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली होती. तर दुसरीकडे काल शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनी ठाण्यात मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांना नाशिकच्या जागेवर त्यांचं नाव निश्चित झाल्याचे बोलले जात आहे, दरम्यान आता मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक जागेवर राष्ट्रवादीचा दावा कायम असल्याचे सांगितले आहे.
छगन भुजबळ यांना उमेदवारीवर दावा कायम असल्याचे सांगितले आहे, यामुळे आता राजकी यवर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. आज छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये पत्रकारांसोबत बोलताना यावर भाष्य केले आहे.
"केंद्रीय मंत्री अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर विश्वास दाखवला मी त्यांचा आभारी आहे. आमच्या तिनही पक्षाकडे मोठे उमेदवार आहेत. उमेदवारीचा लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे. विरोधी उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे ते प्रचारात सध्या पुढे आहेत. केंद्रीय नेतृत्वाने पुन्हा एकदा मला सांगितलं तरीही मी लढणार नाही, असंही मंत्री छगन भुजबळ म्हणाले.
आमचा नाशिकच्या जागेवर अजूनही दावा कायम
" आमच्या कार्यकर्त्यांची अजूनही मागणी आहे. त्यांची समजूत काढावी लागले. गोडसे काल ठाण्यात भेटून आले त्यांनी आम्हाला गोड बातमी द्यावी, असंही भुजबळ म्हणाले. नाशिकच्या जागेवर भुजबळांचं काम केलं तर विधानसभेला मराठा समाज आमच्याविरोधात जाईल का? असं काही जणांना वाटत असेल. मी इथं उभा राहिलो तर इतर ठिकाणी अडचण होईल का असंही काहींना वाटत असेल. मराठा समाजाच्या विरोधात मी कधीच नव्हतो, आमच मत फक्त वेगळं आरक्षण द्या असं होतं. मी ओबीसी समाजाचा मुद्दा कधीच सोडणार नाही, असंही भुजबळ म्हणाले.
'भाजपासोबत जाण्यासाठी चर्चा झाली, पण अंतिम निर्णय...' शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
"आमचा नाशिकच्या जागेवर अजूनही दावा कायम आहे, आमच्याकडे महिला उमेदवारही आहेत. आमच्याकडील लोक सतत काम करत असतात. फक्त निवडणुकीसाठी काम करत नाहीत, भाजपामध्येही उमेदवारी खूप आहेत. शिवसेनेकडेही उमेदवार आहेत, महायुतीचा कोण उमेदवार असेल त्यांचा प्रचार करणार आहे, असंही छगन भुजबळ म्हणाले.
नाशिकमधील महिलांनी माझ्या उमेदवारीसाठी आग्रह केला आहे, मी त्यांचा आग्रह ऐकून घेतला आहे. मी नाराज नाही, अनेकवेळी काही गोष्टी येतात काही गोष्टी येत नाहीत. मी आयु्ष्यात एकदाच तिकीट मागितले होते तेही मुंबई महानगरपालिकेसाठी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे, त्यानंतर मी तिकीट वाटली, असंही भुजबळ म्हणाले.