लोकसभा निवडणूक २०२४: काँग्रेसचा नव्हे हा तर मुस्लिम लीगचा जाहीरनामा- माधव भांडारी
By संकेत शुक्ला | Published: April 24, 2024 05:32 PM2024-04-24T17:32:14+5:302024-04-24T17:34:09+5:30
वारसा हक्क संपत्तीवर कराचा प्रस्ताव अत्यंत धोकादायक
संकेत शुक्ल, नाशिक: देशाची सामाजिक घडी मोडून केवळ अल्पसंख्याक मुस्लिमांच्या लांगूलचालन करण्याचे घातक राजकारण उघडे पडल्यामुळे आता काँग्रेस हादरून गेली असून, संपत्तीचे फेरवाटप करण्याचा माओवादी कट काँग्रेसने जाहीरनाम्याद्वारे रचल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधवराव भांडारी यांनी केला.
भाजपाच्या नाशिक येथील वसंतस्मृती कार्यालयात आले असता बुधवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हा आरोप केला. देशातील साधन संपत्तीवर पहिला अधिकार अल्पसंख्याकांचा, म्हणजे मुस्लिमांचा आहे असा दावा २००६ मध्येच तेव्हाचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी केला होता. आता काँग्रेस सत्तेवर आल्यास तो प्रत्यक्षात आणला जाईल, असा इशाराही भांडारी यांनी दिला. यावेळी व्यासपीठावर आ.प्रा. देवयानी फरांदे, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, ज्येष्ठ नेते विजय साने, माजी महापौर सतीश कुलकर्णी, सरचिटणीस सुनील केदार, ॲड. श्याम बडोदे, रोहिणी नायडू, पवन भगुरकर, गोविंद बोरसे उपस्थित होते.
काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळेच देशातील दलित, मागासवर्गीय, ओबीसी समाज विकासापासून वंचित राहिला असून, केवळ अल्पसंख्याकांची मते मिळविण्यासाठी काँग्रेसने या समाजाची कायम उपेक्षा केली आहे. मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत आखलेल्या प्रत्येक योजनेचा लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला आहे, असा दावाही भांडारी यांनी केला. लोकांकडील अतिरिक्त संपत्ती काढून घेण्याची ही मूळ विचारसरणी माओवादी-नक्षलवाद्यांची असून, काँग्रेस ती प्रत्यक्षात आणू पाहत आहे, असेही ते म्हणाले.
१९६३ व १९७४ मध्ये काँग्रेसने ‘कम्पल्सरी डिपॉझिट स्कीम कायदा’ या गोंडस नावाखाली लोकांची संपत्ती जप्त करण्यासंबंधीचे कायदेच संमत केले होते व त्यामुळे आपल्या कमाईचा १८ टक्के हिस्सा सरकारजमा करणे सरकारी कर्मचारी व संपत्तीधारकांना भाग पडत होते. डॉ. मनमोहन सिंह हेच तेव्हा सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार होते, याकडेही माधवराव भांडारी यांनी लक्ष वेधले.
अनुसूचित जातींच्या यादीत मुस्लिमांचा समावेश करणे, सरकारी नोकऱ्यांत मुस्लिमांना १५ टक्के आरक्षण ठेवणे, धर्माच्या नावाखाली ओबीसी आरक्षणाचे विभाजन करून मुस्लिमांकरिता सहा टक्के रक्षण ठेवणे व धर्मांतरानंतरही अनुसूचित जातींचा दर्जा कायम ठेवणे असे अनेक प्रयत्न काँग्रेसकडून सुरू होते, असा दावा देखील भांडारी यांनी केला. भारतीय जनता पार्टीने नेहमीच अशा राजकारणाविरोधात संघर्ष केला असून, आता देशातील जनता काँग्रेसचा हा कट उधळून लावेल, असा विश्वासही भांडारी यांनी व्यक्त केला.