... यांचेच काही ठरेना, आम्हाला कोणी बोलवेना!

By Suyog.joshi | Published: April 24, 2024 03:40 PM2024-04-24T15:40:35+5:302024-04-24T15:42:24+5:30

Lok Sabha Election 2024 : नाशिकच्या महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराबाबत तरी मनसेच्या स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात सामसूम दिसून येत आहे.

lok sabha election 2024 raj thackeray mns nashik workers | ... यांचेच काही ठरेना, आम्हाला कोणी बोलवेना!

... यांचेच काही ठरेना, आम्हाला कोणी बोलवेना!

नाशिक : महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते यांना आदेश दिले असले तरी स्थानिक स्तरावर म्हणजेच नाशिकच्या जागेसाठी अजूनही काही निर्णय झाला नसल्याने सध्या तरी मनसेनेही वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. मुंबईत शिवाजी पार्क येथे राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचे जाहीर केले. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठे नाराजी तर कुठे आनंद व्यक्त करण्यात आला.

नाशिकच्या महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराबाबत तरी मनसेच्या स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात सामसूम दिसून येत आहे. उमेदवारच जाहीर नसल्याने त्यांच्यातही संभ्रमावस्था आहे. नाशिक मतदारसंघातून मनसेने यापूर्वी २०१४ मध्ये उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांच्या रूपाने दिला होता. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत कोणताही उमेदवार उभा न करता लाव रे तो व्हिडीओद्वारे त्यावेळच्या केंद्र सरकारवर आसूड ओढला होता; परंतु मनसेचा विरोध कालांतराने मावळत गेला. 

सध्याच्या लोकसभा निवडणुकीत मनसे नाशिकमधून उमेदवार देईल अशी शक्यता होती; परंतु मागील तीन-चार महिन्यांपासून त्या दृष्टीने पक्षीय स्तरावर कुठल्याही हालचाली होत नसल्याचे चित्र होते. ऐनवेळी राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराबाबतची घोषणा केली. २००९च्या लोकसभा निवडणुकीत मनसे उमेदवाराने सुमारे दोन लाख मते मिळविली होती. त्याच काळात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शहरात तीन आमदार निवडून आले होते. २०१२ च्या महापालिका निवडणुकीत ४० नगरसेवक मनसेचे होते.

मनसेची २६ ला बैठक
मनसेची येत्या २६ एप्रिल रोजी संपर्कप्रमुख किशाेर शिंदे, गणेश विसपुते, अभिजित पानसे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक होणार आहे. या तिघांचीही निरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील प्रचाराविषयी पदाधिकारी, कार्यकर्ते यांना ते मार्गदर्शन करतील अशी माहिती मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष सलिम शेख यांनी दिली.

आगामी निवडणुकांकडे लक्ष
मागील म्हणजे २०१९ च्या लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकांमध्ये मनसेचे नाशिकसह सर्वत्र नुकसान झाले होते. मतदानाची टक्केवारी अवघी एक ते सव्वा टक्यापर्यंत आली. त्यामुळे लोकसभा निवडणूक न लढता, आता यापुढील काळात मनसेकडून विधानसभा व महापालिका निवडणुकीकडे लक्ष केंद्रित करणार असल्याचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात बोलले जात आहे.
 

Web Title: lok sabha election 2024 raj thackeray mns nashik workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.