अमित किंवा राज ठाकरे नाशिकमधून निवडणूक लढणार?; कार्यकर्त्यांनी पाठवलं पत्र
By संजय पाठक | Published: March 23, 2024 05:10 PM2024-03-23T17:10:13+5:302024-03-23T17:12:59+5:30
सध्या लोकसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू आहे. जागा वाटप जवळपास अंतिम टप्प्यात येत आहे.
नाशिक- पक्ष स्थापनेनंतर राज ठाकरे यांना साथ देऊन तीन आमदार आणि महापालिकेची सत्ता देणाऱ्या नाशिककरांचा मनसेवर विशेष लोभ आहे, त्यामुळे राज ठाकरे किंवा अमित ठाकरे यांनी नाशिक लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवावी असे साकडेच नाशिकच्या कार्यकर्त्यांनी घातले आहे. विशेष म्हणजे मनसे आता महायुतीत सहभागी होणार हे स्पष्ट झाले असतानाही या कार्यकर्त्यांनी दिलेल्या पत्रात मात्र महापालिकेतील भ्रष्टाचारासंदर्भात भाजपचे नाव न घेता टीका केली आहे.
सध्या लोकसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू आहे. जागा वाटप जवळपास अंतिम टप्प्यात येत आहे. मनसेचा महायुतीत सहभाग स्पष्ट झाला असून हा पक्षही नाशिकच्या जागेवर दावेदारी करीत आहेत. अशावेळी राज ठाकरे किंवा अमित ठाकरे यांनीच नाशिकमधून निवडणूक लढवण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. सध्या शिंदे गटाचे खासदार असलेले हेमंत गाेडसे हे सुरूवातीला मनसेचे जिल्हा परीषद सदस्य होते. त्यावेळी त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि समीर भुजबळ यांच्या सारख्या उमेदवाराला त्यांनी चांगलीच लढत देऊन १७ हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता.
दरम्यान, नाशिक शहरातून तीन आमदार महापालिकेत चाळीस तर ग्रामीण भागात १५ नगरसेवक त्यावेळी निवडून आले होते. त्यामुळे राज ठाकरे किंवा अमित ठाकरे यांनी नाशिकमधून निवडणूक लढवावी अशी मागणी उपजिल्हा प्रमुख मनोज घोडके, अमित गांगुर्डे, निखील सरपोतदार, संदीप भवर यांनी राज ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे. आता राज ठाकरे यासंदर्भात काय निर्णय घेतात याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.