लोकसभा निवडणूक : गुगलकडून ‘डुडल’द्वारे भारतीय लोकशाहीचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 01:56 PM2019-04-11T13:56:31+5:302019-04-11T14:02:57+5:30
या डुडलवर क्लिक करताच मतदाराला मतदान, भारतीय निवडणूक आयोगाविषयीची विविध माहिती देणाऱ्या लिंक्स खुल्या होतात. तसेच मतदार जनजागृतीसंबंधित स्थानिक वर्तमानपत्र व वेब न्युज पोर्टलवर झळकलेल्या बातम्याही वाचवयास मिळतात
नाशिक : देशासह राज्यात लोकसभा निवडणूकीला सुरूवात झाली असून ‘गुगल’ सर्च इंजिनकडून भारत अन् भारताच्या लोकशाहीचा सन्मान ‘डुडल’ने करण्यात आला आहे. गुगलकडून गुरूवारी (दि.११) मतदानाचा आकर्षक डुडल पेजवर झळकविण्यात आला आहे. या डुडलवर एका क्लिकवर मतदारांना मतदान प्रक्रियेविषयीची जागृतीपर माहिती सहजरित्या उपलब्ध होत आहे.
गुगल हे लोकप्रिय सर्च इंजिन असून या माध्यमातून दररोज कोट्यवधील ‘नेटीझन्स’ विविध माहिती जाणून घेण्यासाठी याचा उपयोग करतात. या सर्चइंजिनवर येताच डुडलमधील दुसरा ‘ओ’ हा मतदानानंतर बोटाला लावण्यात येणाऱ्या शाईच्या आकाराचा बनविण्यात आला आहे. या डुडलवर क्लिक करताच मतदाराला मतदान, भारतीय निवडणूक आयोगाविषयीची विविध माहिती देणाऱ्या लिंक्स खुल्या होतात. तसेच मतदार जनजागृतीसंबंधित स्थानिक वर्तमानपत्र व वेब न्युज पोर्टलवर झळकलेल्या बातम्याही वाचवयास मिळतात. त्यामुळे हा डुडल अत्यंत लोकप्रिय ठरणार असून संपुर्ण देशात नव्हे तर जगभरात भारतीय लोकसभा निवडणुक या डुडलद्वारे जनतेपर्यंत पोहचणार आहे.
मतदान हे प्रत्येक मतदाराचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावण्याची नितांत गरज आहे. दरवर्षी २५ जानेवारी हा दिवस भारतीय निवडणूक आयोगाकडून ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ म्हणून साजरा केला जातो, अशा प्रकारच्या प्रबोधनपर माहितीसह मतदानपध्दती, मतदानाचे महत्त्व पटवून देणारी माहितीही यावेळी सहज उपलब्ध होते. डुडलसह इंटरनेटवर #भारत हा ट्रेण्डदेखील पहावयास मिळत आहे. गुगलकडून तयार करण्यात आलेला भारतीय निवडणुकांविषयीचा डुडल हा देशाच्या लोकशाहीचा सन्मान मानला जात आहे.
नेटिझन्समंडळीने गुरूवारी सकाळी जेव्हा या सर्च इंजिनवर भेट दिली तेव्हा त्यांच्या डोळ्यांना हा आकर्षक डुडल दिसला त्यानंतर नेटकऱ्यांनी या डुडलची इमेज अन् लिंक्स सोशलमिडियावर शेअर करत मतदान करा, देशाला बळकट बनवा असे घोषवाक्यासह व्हायरल केली.