खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकसाठी हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा केल्याने भाजपाला धक्का, इच्छुक नाराज
By संजय पाठक | Published: March 13, 2024 09:44 AM2024-03-13T09:44:37+5:302024-03-13T09:48:05+5:30
नाशिकची जागा ही भाजपाला मिळावी यासाठी स्थानिक आमदार आणि पदाधिकारी एकवटले होते. या सर्वांनी पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत दिल्ली येथे राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेत्यांना निवेदने दिली होती.
नाशिक - लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाची तयारी अंतिम टप्प्यात असतानाच नाशिकमध्ये शिंदे गटाचे युवा नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकचे उमेदवार म्हणून खासदार हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा केल्यामुळे भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना धक्का बसला आहे.
नाशिकची जागा ही भाजपाला मिळावी यासाठी स्थानिक आमदार आणि पदाधिकारी एकवटले होते. या सर्वांनी पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत दिल्ली येथे राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेत्यांना निवेदने दिली होती. नाशिकची जागा ही भाजपच्या दृष्टीने कशी अनुकूल आहे हे देखील त्यांनी सांगितले होते. विशेषतः नाशिक लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांत तीन आमदार हे भाजपाचे आहेत. शिंदे गटाचा एकही आमदार या मतदारसंघात नाही असे त्यांनी सांगितले होते. भाजपकडे सुमारे आठ ते दहा प्रबळ दावेदार उमेदवार आहेत.
दरम्यान, जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच काल नाशिकमध्ये आलेल्या खासदार श्रीकांत शिंदे यांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात झालेल्या कार्यकर्ता संवाद मिळाव्यात खासदार हेमंत गोडसे हेच लोकसभेचे उमेदवार राहतील असे घोषित केले. त्यामुळे भाजपातील इच्छुकांना धक्का बसला आहे.