आमदार बाळासाहेब सानप यांच्यावर लोकप्रतिनिधींची कुरघोडी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 02:22 PM2018-02-06T14:22:46+5:302018-02-06T14:24:47+5:30
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार मीना यांच्या कामकाजावर लोकप्रतिनिधींसह जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवकांमध्ये तीव्र स्वरूपाची नाराजी होती. सत्ताधारी भाजप व सेनेच्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी देखील मीना यांच्याविरोधात तक्रारी केलेल्या असताना आमदार बाळासाहेब सानप यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मीना यांच्या बाजुने अधिका-यांची बैठक घेवून
नाशिक : कुठल्याही शासकीय अधिका-याची बदली असो वा नियुक्ती जणू काही आपले प्रथम कर्तव्यच असल्याचे समजून स्वत:ला त्यात झोकून घेण्याबरोबरच अन्य लोकप्रतिनिधींना कायम डावलण्यात अग्रेसर असलेले आमदार बाळासाहेब सानप यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार मीना यांच्या पाठीशी उभे केलेले बळ मोडून काढण्यात जिल्ह्यातील अन्य आमदारांना यश मिळाले आहे. सानप यांनी प्रयत्न करूनही मीना यांची बदली ते रोखू न शकल्याने सानप यांचे राजकीय वजन घटल्याचा अर्थ काढला जात असून, काही दिवसांपुर्वी मुख्यमंत्र्यांकडे स्वकीय आमदारांनी केलेल्या तक्रारीतूनच हे घडल्याचे बोलले जात आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार मीना यांच्या कामकाजावर लोकप्रतिनिधींसह जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवकांमध्ये तीव्र स्वरूपाची नाराजी होती. सत्ताधारी भाजप व सेनेच्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी देखील मीना यांच्याविरोधात तक्रारी केलेल्या असताना आमदार बाळासाहेब सानप यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मीना यांच्या बाजुने अधिका-यांची बैठक घेवून त्यांच्यात समझोता घडविण्याचा प्रयत्न केला होता. विशेष म्हणजे मीना यांची बदली करण्यासाठी सेना-भाजप व कॉँग्रेस आघाडीच्या दहा आमदारांनी व ३७ जिल्हा परिषद सदस्यांनी मुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्र्यांकडे लेखी स्वरूपाच्या तक्रारी केलेल्या असतानाही सानप यांनी या तक्रारींकडे बेफिकीरीने पहात मीना यांच्या बाजुने समर्थन उभे केले होते. त्याच्या या कृतीबद्दल ग्रामीण भागातील आमदारांनी तीव्र संताप व्यक्त करून, सानप यांच्या मध्यस्थीबद्दलच शंका घेतली होती. शासकीय अधिकाºयांच्या बदल्या व नियुक्त्यांमध्ये ‘रस’ असलेल्या सानप यांचे अभय मिळाल्याचे समजून मीना यांनी आपल्या वर्तुणूकीत बदल करण्याऐवजी उलट या वादात वरिष्ठ अधिका-यांनाच गोवण्याचा प्रयत्न केल्यामुळे जिल्ह्यातील अन्य लोकप्रतिनिधींमध्ये संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे मीना यांच्या आडून सानप यांना धडा शिकविण्यासाठी काही आमदारांनी गेल्या चार दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून मीना यांची बदली करण्यास मुख्यमंत्र्यांना भाग पाडल्याचे आता बोलले जात आहे. लोकप्रतिनिधींच्या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी मीना यांची बदली करून आणण्यात सानप विरोधी आमदार यशस्वी झाल्यामुळे त्यांचे बळ वाढले असून या प्रकरणामुळे सानप यांचे राजकीय वजन कमी झाल्याची चर्चा पक्षांतर्गंत केली जात आहे. खुद्द सानप यांच्यासाठी देखील हा मोठा धक्का मानला जात आहे.