लोकसभा, विधानसभेसाठी पक्षाचा आदेश पाळणार : माणिकराव कोकाटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 12:04 AM2018-05-29T00:04:57+5:302018-05-29T00:04:57+5:30
कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विषयी गैरसमज न ठेवता झोकून देऊन काम करण्याची गरज आहे. काळानुसार प्रत्येकाला योग्य ती संधी मिळणार आहे मात्र त्यासाठी तुम्ही सातत्य ठेवणे गरजेचे आहे. जनतेत राहून प्रत्येकाची मने जिंका. मी नेहमी सच्चा कायकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेलो आहे. भविष्यात लोकसभा की विधानसभा हे पक्षाने दिलेल्या आदेशावरून ठरविण्यात येईल,
सिन्नर : कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विषयी गैरसमज न ठेवता झोकून देऊन काम करण्याची गरज आहे. काळानुसार प्रत्येकाला योग्य ती संधी मिळणार आहे मात्र त्यासाठी तुम्ही सातत्य ठेवणे गरजेचे आहे. जनतेत राहून प्रत्येकाची मने जिंका. मी नेहमी सच्चा कायकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेलो आहे. भविष्यात लोकसभा की विधानसभा हे पक्षाने दिलेल्या आदेशावरून ठरविण्यात येईल, असे सांगत माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी राजकारणात पुन्हा जोमाने सक्रिय होण्याचे संकेत दिले. सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा येथील माउली लॉन्स येथे माजी आमदार कोकाटे यांच्या कार्यकर्त्यांच्या सुसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कोकाटे यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतानाच भविष्यात आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगून पुन्हा एकदा लढण्यासाठी सज्ज झाल्याचे सांगितले. सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक तांबे, सुनील नाईक, पांडुरंग वारुंगसे, रामा बुचुडे, नितीन शिंदे, शेखर चोथवे, योगेश माळी, वाळीबा बुरकुल, शशिकांत गाडे, बापू गोजरे या कार्यकर्त्यांनी कोकाटे समर्थकांच्या सुसंवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. सत्तेत असताना आपल्याला ज्या संस्था मिळाल्या त्या पुरेपूर तालुक्यातील जनतेसाठी वापरल्या, शेतीच्या प्रश्नाबरोबर बेरोजगारीचे प्रश्न सुटले पाहिजे, नवीन तरुण पिढीला रोजगार निर्माण झाला पाहिजे याचा विचार कायम केला. आज इंडिया बुल्स बंद पडली, अजूनही काही कंपन्या बंद पडल्या, मात्र सेनेचे उद्योगमंत्री गप्प असल्याचे ते म्हणाले. हे सगळे प्रश्न जर लोकप्रतिनिधी सोडवणार नसेल तर मग हे आपण कशाला निवडून देतो, असा सवाल कोकाटे यांनी उपस्थित केला. सिन्नर शहरात पाणीप्रश्न असताना लोक शांत का, असे सवाल त्यांनी उपस्थित केला. या मेळाव्यात जयंत आव्हाड, सुधाकर शिंदे, सोमनाथ भिसे, देवा आवारे, उत्तम सानप, शिवाजी हलवर, विजय आव्हाड, आकाश सहाने, मारुती बिन्नर, रामदास जायभाये, जयराम थोरात, किसन शिंदे, सुधीर रावळे या कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले.
मी संपूर्ण तालुक्याचा कुटुंबप्रमुख...
गेल्या तीन वर्षात संपर्क कमी झाल्याने गैरसमजदेखील निर्माण झाले असतील, कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं ही भावनादेखील मनात येऊ शकते अन् काहीअंशी ते सत्यदेखील आहे. ज्या गोष्टी चुकल्या त्याची कबुली दिली पाहिजे अन् ज्या गोष्टी चांगल्या केल्या त्याचे समर्थनदेखील केले पाहिजे, अशी कबुलीदेखील कोकाटे यांनी यावेळी बोलताना दिली. विकासासाठी मुंबई-दिल्ली वाºया झाल्या त्यातून संपर्क कमी झाल्याने पराभव झाला. जनसंपर्क कमी होण्यात काही कौटुंबिक अडचणी होत्या. तथापि, मी माझ्या कुटुंबापुरता मर्यादित नसून संपूर्ण तालुक्याचा कुटुंबप्र्रमुख आहे. त्यामुळे या तालुक्याच्या प्रत्येक कुटुंबावर आलेले संकट हे आपले संकट आहे असे मी मानतो, असेही कोकाटे म्हणाले.