लोकमत एनपीएल क्रिकेट स्पर्धा : मेहराज सामनावीर, स्वप्नील राठोडचे वादळी अर्धशतक
By admin | Published: December 27, 2016 01:22 AM2016-12-27T01:22:25+5:302016-12-27T01:22:25+5:30
अथर्व विरुद्ध संदीप सामना बरोबरीत
नाशिक : राजुरी स्टील प्रस्तुत लोकमत एनपीएल सिझन- ६ च्या दहाव्या सामन्यात अथर्व रॉयल्स विरुद्ध संदीप फाल्कन्सची लढत रंगली. अत्यंत अटातटीचा झालेला हा सामना बरोबरीत राखण्यात संदीप फाल्कनला यश आले. त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्याच्या या संघाच्या आशाही पल्लवित झाल्या असून, संघासाठी ४० धावांची झुंजार फलंदाजी करणाऱ्या मेहराज सय्यदला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अथर्व रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर स्वप्नील राठोड ५४ व कपील शिरसाठ २७ धावांच्या जोरावर १४६ धावांपर्यंत मजल मारली. त्यांनी सलामीला ७५ धावांची भागिदारी रचली. मात्र संघातील अन्य फलंदाजांनी निराशा केली. कपील शिरसाठ हा रोहित भोरेच्या चेंडूवर मोहन केसीला झेल देऊन बाद झाला. राहुल विश्वकर्माला १ धावेवर तुषार इंद्रीकरने सागर लभडेकरवी झेलबाद केले. केंदळेने संघाचा डाव सावरत १ चौकार आणि १ षटकार टोलवून २३ धावा केल्या. तो मोहन केसीच्या चांगल्या चेंडूला सीमापार पाठविण्याच्या नादात रोहित भोरेच्या हातात झेल देऊन तंबूत परतला. मयूर वाघला २ धावांवर भोरेने इंद्रीकरकरवी झेलबाद केले. जय वैष्णवने १७ चेंडू खेळताना ३ चौकार ठोकले. परंतु तोही १८ धावा करून मोहन केसीच्या चेंडूवर अमित लहामगेच्या हाती झेल देऊन बाद झाला. मागच्या सामन्यात वादळी फलंदाजी करणारा सुनील या सामन्यात केवळ २ धावा करू शकला. मेहराज सय्यदने त्याचा त्रिफळा उडविला. विजयासाठी १४७ धावांचे लक्ष्य समोर ठेवून मैदानात उतरलेल्या संदीप फाल्कन्सच्या संघाची सुरुवातच खराब झाली. सलामीवर राहुल खूशवाह ११ व मुझफ्फर सय्यद १० धावा करून बाद झाले. फाल्कन्सला २२ धावांवर पहिला धक्का बसला. सुजय महाजन १७ धावांवर बाद झाल्यानंतर कर्णधार मनोज परदेशीने पुन्हा एकदा संघाची धुरा खांद्यावर घेऊन चांगला खेळ केला. त्याने ३३ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. तर मेहराज सय्यदने १७ चेंडूंमध्ये ४ षटकार व १ चौकार फटकावत नाबाद ४० धावा करून संघाला पराभवाच्या गर्तेतून बाहेर काढले. मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. तत्पूर्वी संदीप फाल्कनकडून मेहराज सय्यद, मोहन केसी व रोहित भोरे यांनी प्रत्येकी २ फलंदाजांना तंबूची वाट दाखविली. तर तुषार इंद्रीकरने एक बळी मिळवला. अथर्व रॉयल्सकडून सलील आगरकरने व रवींद्र कुमार यांनी प्रत्येकी २ व गौरव काळेने ३ फलंदाजांना तंबूत धाडले. तेजस पवारनेही १ गडी बाद केला. अत्यंत अटातटीच्या सामन्यात शेवटपर्यंत प्रेक्षकांमध्ये विजेत्या संघाविषयी उत्कंठा पहायला मिळाली. (प्रतिनिधी)