भाजपाच्या काळात लोकशाही मृत्युशय्येवर : कन्हैया कुमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 01:44 AM2018-08-21T01:44:15+5:302018-08-21T01:45:08+5:30
नाशिक : लोकशाहीचा पाया असलेल्या जनतेला भ्रमिष्ट करून या पायावर आधारलेल्या चारही मुख्य स्तंभ या सरकारने खिळखिळी
केली आहेत. जनतेसाठी ही मोठी चिंतेची बाब असून लोकशाही मृतशय्येवर पोहचली असताना तिच्या हत्येचे साक्षीदार आपण होता कामा नये. सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून सरकारच्या आश्वासनांवर गांभीर्याने मनुष्य म्हणून विचार करावा तरच भारत सक्षम होईल. सत्ताधारी भाजपा सरकारला प्रश्न विचारण्याचे धाडस केलेच पाहिजे, तरच भारताची लोकशाही जीवंत राहील, असे प्रतिपादन अखिल भारतीय विद्यार्थी फेडरेशनचा नेता कन्हैया कुमार याने केले. शहरातील पुरोगामी, सामाजिक संघटनांच्या वतीने सोमवारी (दि.२०) परशुराम साईखेडकर नाट्यगृहात डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेत कन्हैया प्रमुख वक्ता म्हणून बोलत होता. ‘युवाओं निर्भय बनो...सवाल पुछो’ या विषयावर कन्हैयाने व्याख्यानमालेचे ५६वे पुष्प गुंफले. यावेळी मंचावर पल्लवी चिंचवाडे, समाधान बागुल उपस्थित होते. कन्हैया याने आपल्या खास शैलित निर्भिडपणे सरकारवर हल्लाबोल केला. सुरुवातीला त्याने मराठीवर प्रभुत्व नसल्याची खंत व्यक्त करीत उपस्थितांची माफी मागितली आणि हिंदी भाषेतून आपल्या व्याख्यानाला प्रारंभ केला. यावेळी कन्हैया म्हणाला, या सरकारकडून देशातील जनतेपुढे जे चित्र रंगविले जात आहे ते अत्यंत खोटे आणि दिशाभूल करणारे आहे. देशाच्या मूलभूत प्रश्नांवर समाजातून एल्गार पुकारला गेला की, हे सरकार त्यांची दिशाभूल करण्यासाठी तयार असते, अशी टीका कन्हैयाने यावेळी केली. या देशात बलात्कार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, समाजघटकांचे संप सुरू असतानाही माध्यमांमध्ये चर्चा केवळ जाती-धर्माच्या प्रश्नांवर केली जाते किं बहूना ती घडवून आणली जाते हे लोकशाहीचे दुर्दैवच आहे. प्रास्ताविक सागर निकम यांनी केले. सुत्रसंचालन सचिन मालेगावकर यांनी केले.
भाजपामध्ये भ्रष्टाचा-यांचे ‘वेलकम’
‘सभी भ्रष्टाचारीयो को जेल में डालेंगे’ असे आश्वासन देशाला देणारे मोदी यांनी सर्व कॉँग्रेसी भ्रष्टाचारी नेत्यांचे भाजपामध्ये ‘वेलकम’ केले. हे सरकार जनतेला मुर्ख समजण्याची मोठी चूक करीत आहेत. जेव्हा भारतीयांच्या संयमाचा अन्् सहनशीलतेचा अंत होईल, तेव्हा लोकशाहीच्या संरक्षणार्थ मोठी क्रांती या देशात घडून येईल, असा विश्वासही कन्हैयाने बोलताना व्यक्त केला.
एकात्मता टिकवून ठेवण्याचे आव्हान
जाती-धर्माच्या उन्मादात भारताच्या लोकशाही अन् माणुसकीचा बळी दिला जात आहे. त्यामुळे भारतीयांनी आपली एकात्मता टिकवून ठेवली पाहिजे. कारण हा देश सर्व जाती-धर्माचा आहे. त्यामुळे या देशात सर्वांना समान हक्क व अधिकार या संविधानाने दिले आहे, हे आपण विसरून चालणार नाही, कारण आपल्याला आपल्या जाती-धर्मापेक्षा देश महत्त्वाचा आहे, असे कन्हैयाने यावेळी आवर्जून सांगितले.
...तर लोकशाहीचा अंत
प्रत्येक भारतीयाने आपल्या डोळ्यांची झापडे काढून फेकण्याची गरज आहे. विवेकबुद्धीने तर्कशुद्ध विचाराने या सरकारला आपल्या मूलभूत समस्यांविषयी प्रश्न विचारण्याचे धाडस केले पाहिजे, असे कन्हैया म्हणाला. ज्या व्यक्तीमध्ये धाडस आहे, तोच प्रश्न विचारू शकतो, हे लक्षात घ्यावे. जनतेने प्रश्न विचारणे बंद केले तर मृतशय्येवर पोहचलेल्या लोकशाहीचा अंत झाल्याशिवाय राहणार नाही. लोकांना मानसिक गुलामगिरीतून स्वतंत्र होण्याची गरज आहे. जे आपल्यासमोर दाखविले जाते किंवा आणले जाते ते सत्यच असते, असा अंधविश्वास दूर करावा.