घरफोड्यांमध्ये ऐवज लंपास घरफोडी सत्र : सुटीपूर्वीच चोरटे सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:59 AM2018-04-11T00:59:29+5:302018-04-11T00:59:29+5:30
नाशिक : उन्हाळ्याच्या सुटीत बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांच्या घरांवर डोळा ठेवून घरफोडी करणारे चोरटे सुट्यांपूर्वीच सक्रिय झाले आहेत.
नाशिक : उन्हाळ्याच्या सुटीत बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांच्या घरांवर डोळा ठेवून घरफोडी करणारे चोरटे सुट्यांपूर्वीच सक्रिय झाले आहेत़ शहरातील उपनगर, अंबड व नाशिकरोड या विविध परिसरातील तीन ठिकाणी घरफोडी करून चोरट्यांनी सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे़ सोन्याचे दागिने, रोख रक्कम व हॉस्पिटलमधील अॅटो रिफॅक्टोमीटरही चोरट्यांनी चोरून नेले आहे़ उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलिंग वाढवून पोलिसांनी घरफोड्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़ गणेश चंद्रकांत डबे (४०, श्री गणेश बंगला, हरीओमनगर, आर्टिलरी सेंटररोड, नाशिकरोड) यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार ६ एप्रिल ते ८ एप्रिल या कालावधीत ते कुटुंबासह बाहेरगावी गेले होते़ यादरम्यान चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला़ तसेच घराच्या बेडरूममधील लाकडी कपाटातून ४५ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले़ चोरून नेलेल्या दागिन्यांमध्ये ५ ग्रॅम वजनाची सोन्याची दोन नाणी, पंधरा ग्रॅम वजनाची चांदीची तोरडी, २५ ग्रॅम वजनाची चांदीची नाणी, पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, पाच गॅ्रम वजनाचे सोन्याचे टॉप्स व १६ हजार रुपयांच्या रोख रकमेचा समावेश आहे़ या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दुसरी घटना सिडकोतील शिवपुरी चौकात घडली़ प्रकाश बागुल (शिवपुरी चौक, अतुल डेअरीच्या मागे, उत्तमनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवारी (दि़७) मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांचा तसेच त्यांच्या घराशेजारी राहणारे संदीप आहेर यांच्या घराच्या दरवाजाचा घरात प्रवेश केला़ तसेच घरातून सोन्याचे मंगळसूत्र, दोन सोन्याच्या अंगठ्या, एलसीडी टीव्ही, मोबाइल असा ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला़