चौधरी कुटुंबीयांचा एकुलता एक हिंमत काळाने हिरावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:14 AM2021-04-18T04:14:28+5:302021-04-18T04:14:28+5:30
सिडको : येथील अत्यंत गोरगरीब कुटुंबातील चाैधरी कुटुंबाचा एकुलता एक मुलगा हिंमतचा वालदेवी धरणावरील घडलेल्या दुर्घटनेत बुडून मृत्यू झाला. ...
सिडको : येथील अत्यंत गोरगरीब कुटुंबातील चाैधरी कुटुंबाचा एकुलता एक मुलगा हिंमतचा वालदेवी धरणावरील घडलेल्या दुर्घटनेत बुडून मृत्यू झाला. या घटनेने त्याची आई सरला यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. लहानपणीच पितृछत्र हरपल्याने हिंमतला त्याच्या आईने मोठे काबाडकष्ट करत त्याला वाढविले होते आणि त्याला चांगली नोकरी मिळेल आणि आपल्या जीवनाचे सार्थक होईल, असे स्वप्न तिने बघितले होते. मात्र, काळाने हे स्वप्न तिच्या डोळ्यांतून कायमचेच हिरावून घेतले.
गेल्या अनेक वर्षांपासून सिडकोतील सिंहस्थनगर भागात भाड्याची खोली घेऊन राहणाऱ्या सरला चौधरी या गेल्या अनेक दिवसांपासून अंबड येथील एका खासगी कंपनीमध्ये जेमतेम पगारावर काम करीत आहेत. सध्या कोरोना महामारीमुळे संचारबंदी, तसेच कडक निर्बंध लादण्यात आल्याने त्यांचे कामही बंद पडले आहे. त्यांचा एकुलता एक मुलगा हिंमत हाच त्यांचा मोठा आधार होता. गेल्या अनेक वर्षांपासून काबाडकष्ट करीत असल्याने पुढील आयुष्य मुलगा हिंमतच्या हिमतीवर चांगले जाईल अन् सुखाचे क्षण भोगता येतील, अशी आशा बाळगून असलेल्या सरला यांच्या या आशेवर नियतीने पूर्णत: पाणी फिरविले. त्यांचा एकमेव आधार कायमचा हिरावून घेतला.
---इन्फो---
जेवणाचे ताटही वाढता- वाढता राहिले
वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्रांसोबत जात असल्याचे हिंमतने त्याच्या आई सरला यांना सांगितले असता आईने त्यास ‘थांब, दुपारचे जेवण कर अन् मग जा, मी ताट वाढते...’ असे सांगितले. मात्र, त्याने आईला ‘जेवण नको, आई मी जेवलो आहे,’ असे सांगितले आणि हिंमत घराबाहेर पडला तो कायमचचाच...