शहरासह लांब पल्ल्याची बससेवा ठप्प; ऐन दिवाळीत नागरिकांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 04:52 PM2017-10-17T16:52:48+5:302017-10-17T17:09:32+5:30
नाशिक : सातवा वेतन आयोग सरकारने एसटी कामगारांना लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेने राज्यव्यापी संपाची हाक सोमवारी मध्यरात्रीपासून दिली. या संपाचा प्रभाव नाशिक शहरासह जिल्ह्यावर पडला. सकाळपासून एसटीच्या कुठल्याही स्थानकामधून प्रवासी वाहतूक होऊ शकली नाही. ऐन दिवाळीच्या कालावधीत पुकारलेल्या या संपामुळे मूळगावी सण साजरा करण्यासाठी जाणार्या सर्वसामान्यांचे मोठे हाल झाले. पंधरवड्यापूर्वी अगोदर संपाची नोटीस देण्यात आली होती; मात्र सरकारने तोडगा काढला नाही. यामुळे संपाला सरकार जबाबदार असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
एसटी कामगार संघटनेने पुकारलेल्या बेमुदत राज्यव्यापी संपाला शहरात शिवसेनाप्रणीत एसटी कामगार सेना वगळता सर्व संघटनांनी पाठिंबा दर्शविला. यामुळे नाशिक विभागातील सुमारे सहा हजार कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.
सकाळ सत्रातील ३७ बसेस दुुपारी बारा वाजेपर्यंत रस्त्यावर धावत होत्या. एकूणच सकाळच्या सत्रातही केवळ तीस टक्के प्रवासी वाहतूक निमाणी स्थानकातून झाली. त्यानंतर रात्रीपर्यंत सर्वच बसेसला ‘ब्रेक’ लागलेला होता. निमाणी स्थानकातून सकाळपासून रात्रीपर्यंत प्रवासी वाहतुकीच्या आठशे फेर्या होतात. एकूणच शहर प्रवासी वाहतूक पूर्णपणे ठप्प राहिली. तसेच लांब पल्ल्याची वाहतूकही बंद होती.
महामार्ग, जुने मध्यवर्ती बसस्थानक, नवीन मध्यवर्ती बसस्थानक, नाशिकरोड स्थानक यांमध्ये केवळ बसेसच्या रांगा लागल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. दुपारी बारा वाजेनंतर सर्वच स्थानकांमध्ये शुकशुकाट पसरला होता. एकूणच शहरासह लांब पल्ल्याची बससेवा ठप्प झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल झाले. शहरातील रस्त्यावर डोळ्यांना ‘लाल परी’ दिसेनासी झाली होती. बससेवा ठप्प झाल्याने प्रवासी वाहतुकीची सर्व भिस्त खासगी वाहतुकीवर होती. काळ्या-पिवळ्या जीप, रिक्षा, ट्रॅव्हल्सचा आधार घेत प्रवाशांनी आपले गाव गाठण्याचा प्रयत्न केला; मात्र हे करताना गैरसोयीचाही प्रवाशांना सामना करावा लागला.