नाशिक : शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी निघालेला लॉन्ग मार्च मोर्चा मुंबईच्या दिशेने
By संदीप भालेराव | Published: March 14, 2023 12:52 PM2023-03-14T12:52:51+5:302023-03-14T12:53:41+5:30
आदिवासींच्या वन जमिनी बरोबरच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी निघालेला लॉन्ग मार्च मोर्चा मंगळवारी मुंबईच्या दिशेने निघाला आहे.
नाशिक : आदिवासींच्या वन जमिनी बरोबरच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी निघालेला लॉन्ग मार्च मोर्चा मंगळवारी मुंबईच्या दिशेने निघाला आहे. दरम्यान, आज दुपारी साडेतीन वाजता मुख्यमंत्र्यांबरोबर होणाऱ्या बैठकीनंतर मोर्चा बाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती मोर्चाचे नेतृत्व करणारे माजी आमदार जे.पी. गावीत त्यांनी दिली
गेल्या रविवारपासून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून आदिवासींचे हे लाल वादळ विधिमंडळावर मोर्चा घेऊन निघाले आहे. सोमवारी नाशिक जवळील आंबे बहुला गावात रात्रीचा मुक्काम केल्यानंतर मंगळवारी सकाळी मोर्चेकरी मुंबईकडे निघाले. मोर्चात सुमारे दहा हजार आदिवासी बांधव सहभागी झाले असून आतापर्यंत त्यांनी सुमारे 70 किलोमीटर पायी अंतर पूर्ण केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतरही निर्णय झाल्यास मोर्चा तसाच सुरू राहणार असून 23 मार्चपर्यंत मुंबई गाठण्याचे नियोजन आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार पाच जणांचे शिष्टमंडळ दुपारी मुंबईकडे रवाना होणार असून मुख्यमंत्र्यांबरोबर आदिवासींच्या प्रश्नांवर चर्चा होणार आहे. एकीकडे चर्चा सुरू असली तरी मोर्चा मात्र मुंबईच्या दिशेने चालतच राहणार असल्याचे गावित यांनी सांगितले