सर्जा-राजाच्या साजशृंगार खरेदीसाठी लगबग
By Admin | Published: August 27, 2016 10:20 PM2016-08-27T22:20:21+5:302016-08-27T22:20:32+5:30
सर्जा-राजाच्या साजशृंगार खरेदीसाठी लगबग
वडाळीभोई : पोळा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, आपल्या सर्जा- राजाला सजविण्यासाठी मोरक्या, झूल, दोर, रंगीबेरंगी गौंडे आदि साजश्रृंगाराचे साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांनी गुरुवारी वडाळीभोई येथील आठवडे बाजारात गर्दी होती.
शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा देऊन राबणाऱ्या बैलांचा विश्रामाचा दिवस म्हणजे पोळा. सातत्याच्या दुष्काळी स्थितीमुळे काही वर्षांपासून हा सण काहीसा साध्या पध्दतीने साजरा केला होता. आपली बैलजोडी इतरांपेक्षा चांगली दिसावी म्हणून शेतकऱ्यांमध्ये चढाओढ लागलेली असते.
यंदा सजावटीच्या वस्तूंनाही महागाईने ग्रासले आहे. आर्थिक अडचणीत असतानाही पैशांची जुळवाजुळव करुन महागाईची तमा न बाळगता शेतकरी वर्ग आपल्या सर्जा-राज्याला सजविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे बाजारातील गर्दीवरून दिसून येते. यंदा पाऊसपाणी चांगला झाल्याने साहित्यात भाववाढ झाली असली तरी खरेदीसाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे, असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. (वार्ताहर)